मुंबई : सध्या देशासह राज्यात निवडणुकीची (Loksabha Election) धूम आहे. राजकीय पक्षांचे नेते आपापल्या उमेदवारांच्या प्रचारात गुंतलेले आहेत. महाराष्ट्रात सध्या तापमानात वाढ झालेली आहे, तरीदेखील उन्हाची पर्वा न करता ही नेतेमंडळी गाव-खेड्यात जाऊन लोकांना मतं मागत आहेत. दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची असणार आहे. त्यामुळेच त्यांचे कुटुंबीय प्रचाराच्या मैदानात उतरले आहे. अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार (Parth Pawar) हेदेखील पूर्ण ताकदीने प्रचार करत आहेत. त्यांना आता थेट वाय प्लस दर्जाची सुरक्षा (Parth Pawar Y Plus Security) देण्यात आली आहे. राज्य सरकारने तसा निर्णय घेतला आहे.
पार्थ पवार यांचा आईसाठी प्रचार
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांना वाय प्लस दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे. चार दिवसांपूर्वीच राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे. पार्थ पवार यांच्या आई सुनेत्रा पवार यांच्या प्रचारासाठी पार्थ पवार बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये प्रचारसभा घेत आहेत. कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेऊन ते मतदारसंघातील नागरिकांसोबत संवाद साधत आहेत. याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारने पार्थ पवार यांना वाय प्लस दर्जाची सुरक्षा देण्याचा निर्णय घेतला आहे.
युगेंद्र पवार यांना घेराव, सुरक्षेची केली होती मागणी
पवार कुटुंबातील युगेंद्र पवार हे शरद पवार यांच्या गटात आहेत. ते राष्ट्रवादी (शरद पवार गट) पक्षाच्या बारामतीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांचा प्रचार करत आहेत. त्यांना काही दिवसांपूर्वी प्रचारासाठी गेल्यानंतर लोकांनी घेराव घातला होता. अजित पवार यांच्या नावे चुकीचे व्हिडीओ व्हायरल केले जात आहेत, अशा दावा या लोकांनी केला होता. या घटनेनंतर सुप्रिया सुळे यांनी युगेंद्र पवार तसेच रोहित पवार यांना सुरक्षा पुरवण्याची मागणी केली होती. या मागणीनंतर विरोधकांनी त्यांच्यावर टीका केली होती.
महत्त्वाच्या व्यक्तींची सुरक्षा काढली
एकीकडे पुणे पोलीस आयुक्तांनी निवडणूकीच्या काळात महत्त्वाच्या व्यक्तींची सुरक्षा काढली आहे. पण दुसरीकडे मात्र राज्य शासनानेच उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या चिरंजीवांना वाय प्लस सुरक्षा दिली आहे.
हेही वाचा :
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदासाठी तुमचं ग्रुमिंग करणार होते; आदित्य ठाकरे म्हणाले...
'प्रचारात पैसे वाटल्याची सत्यता पडताळा', ओमराजेंसह अर्चना पाटीलही निवडणूक आयोगाच्या रडारवर