![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
'भिडे' वाड्यावरुन पुतण्याचा अजित काकांना तिखट सवाल; भाजपा समर्थकाचा पलटवार
सुनेत्रा पवार यांचा बारामती लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी अजित पवारांनी पुण्यात दगडूशेठ गणपतीचे दर्शन घेतले
!['भिडे' वाड्यावरुन पुतण्याचा अजित काकांना तिखट सवाल; भाजपा समर्थकाचा पलटवार Rohit pawar on Ajit pawar visit to Pune Dagadusheth ganpati bjp workers reply tweet maharasthra news marathi news 'भिडे' वाड्यावरुन पुतण्याचा अजित काकांना तिखट सवाल; भाजपा समर्थकाचा पलटवार](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/04/19/d5ad1f42240430fd5be400d0990ee8bc17135165715421002_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई/पुणे - महाराष्ट्रातील 48 लोकसभा मतदारसंघातील निवडणुकांसाठी प्रचाराने वेग घेतला असून महाविकास आघाडी व महायुतीच्या नेत्यांनी कंबर कसली आहे. महाराष्ट्रात 45 पेक्षा अधिक जागेवर विजय मिळवण्याचा संकल्प करत देवेंद्र फडणवीसांच्या (Devendra Fadanvis) नेतृत्त्वात भाजपा महायुतीने प्रचारांचा धडाका लावला आहे. त्यातच,उमेदवारी अर्ज भरण्यासाठी पक्षाचे वरिष्ठ नेते हजेरी लावत आहेत. त्यानंतर, आयोजित सभेतून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही पक्षातील नेतेही आक्रमक झाले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हेही आता थेट भाषणातून हल्लाबोल करत आहेत. गुरुवारी सुनेत्रा पवार यांचा उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर जाहीर सभा झाली. तत्पूर्वी अजित पवारांनी सपत्नीक पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेतले. आता, यावरुन आमदार रोहित पवारांनी अजित पवारांना टोला लगावला आहे.
सुनेत्रा पवार यांचा बारामती लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी अजित पवारांनी पुण्यात दगडूशेठ गणपतीचे दर्शन घेतले. मात्र, दगडूशेठ गणपती मंदिरापासून जवळच असलेल्या सावित्रीबाई फुले व महात्मा ज्योतिबा फुले यांच्या भिडे वाड्याला का भेट दिली नाही, म्हणून पुतण्याने अजित काकांना तिखट सवाल केला आहे. यावेळी, संभीज भिंडेंचा फोटो शेअर करत, नव्या संगतीतील परिणाम आहे का, असेही रोहित पवार यांनी म्हटले.
शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेच्या माध्यमातून हिंदूंसाठी काम करणारे गुरुजी म्हणून संभाजी भिडे प्रसिद्ध आहेत. त्यातच, गेल्या काही वर्षात ते आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळेंही सोशल मीडियात चर्चेत असतात. गुरुवारी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याने त्यांची राजकीय वर्तुळात चर्चा होती. आता, रोहित पवार यांनी अजित पवारांसमवेतचा त्यांचा फोटो शेअर करुन तिखट सवाल केला आहे. त्यामुळे, पुन्हा एकदा भिडे गुरुजी माध्यमांत आहेत.
मा. अजितदादा उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी आपण सुनेत्राकाकींसह दगडूशेठ हलवाई गणपतीचं दर्शन घेतलंत, याचा आनंद आहे. पण, क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले यांनी देशात सर्वप्रथम स्त्री शिक्षणाची ज्योत जिथं प्रज्वलित केली, त्या समोरच असलेल्या भिडेवाड्यालाही हात… pic.twitter.com/ewPGkymnO2
— Rohit Pawar (@RRPSpeaks) April 19, 2024
रोहित पवाराचं ट्विट
''अजित दादा उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी आपण सुनेत्राकाकींसह दगडूशेठ हलवाई गणपतीचं दर्शन घेतलंत, याचा आनंद आहे. पण, क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले यांनी देशात सर्वप्रथम स्त्री शिक्षणाची ज्योत जिथं प्रज्वलित केली, त्या समोरच असलेल्या भिडेवाड्यालाही हात जोडले असते तर अधिक आनंद झाला असता. पण, कदाचित नव्या संगतीच्या परिणामाने आपण तिकडं दुर्लक्ष केलं की महात्मा फुलेंबाबत वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या एका कथित गुरुजींशी आपली चर्चा झाल्याने त्यांनी भिडे वाड्याला नमस्कार न करण्याचा कानमंत्र आपल्याला दिला, हे माहीत नाही'', असे म्हणत रोहित पवारांनी अजित दादांना लक्ष्य केलं. दरम्यान, ''पण बाकी काही असो,आपला 'मोदी टू द्रौपदी' प्रवास मात्र एक्स्प्रेस झाला'', अशी बोचरी टीकाही रोहित पवारांनी अजित पवारांना उद्देशून केली आहे.
भाजपा समर्थकांकडूून ट्विटला रिप्लाय
देवांची जागा आणि मान वेगळा. उगाच सगळीकडे तुमच्या मनातील महापुरुष घुसवू नका. त्यांना सल्ला देण्याएवढे मोठे नाही झालात तुम्ही अजून.
— Amruta (Modi Ji ka Parivar)🇮🇳 (@SjAmruta) April 19, 2024
आमदार रोहित पवार यांच्या ट्टिवटवर भाजपा समर्थकांनी ट्विट करुन रोहित पवारांना सवाल केला आहे. देवांची जागा आणि मान वेगळा. उगाच सगळीकडे तुमच्या मनातील महापुरुष घुसवू नका. त्यांना सल्ला देण्याएवढे तुम्ही अजून मोठे झाला नाहीत, असे ट्विट अमृता नावाच्या ट्विटर युजर्सने केले आहे. विशेष म्हणजे या युजर्सने आपल्या नावापुढे मोदी का परिवार असेही लिहिले आहे. तर, अभिषेक सोमवंशी नावाच्या युजर्सने जयंत पाटलांना या वादात ओढले आहे. जयंत पाटलांचेही त्या गुरुजींबद्दल समान मत आहे का, असा सवाल अभिषेक यांनी विचारला आहे.
जयंत पाटलांचं सेम मत आहे का त्या कथित गुरुजींबद्दल?😂
— Abhishek Somwanshi (@abhisanket) April 19, 2024
संभाजी भिडे अन् फडणवीसांची सांगलीत भेट
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी गुरुवारी सांगलीमध्ये शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे उर्फ भिडे गुरुजींची भेट घेतली. या भेटीची सध्या राजकीय वर्तुळात चर्चा रंगली. सांगलीच्या दौऱ्यासाठी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे हेलिकॉप्टराने कवलापूर विमानतळावर दाखल झाले. त्यावेळी विमानतळावर संभाजी भिडे उपस्थित होते. फडणवीस हेलिकॉप्टरमधून उतरल्यानंतर संभाजी भिडे त्यांना भेटले. त्यानंत भिडे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात काहीवेळ चर्चा झाली. संभाजी भिडे हे देवेंद्र फडणवीस यांचा हात धरून त्यांना काहीतरी सांगत होते. यानंतर देवेंद्र फडणवीस किंचित खाली झुकले आणि संभाजी भिडे यांनी त्यांच्या कानात काही महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या. या दोघांमध्ये नेमकी काय चर्चा झाली, यावर राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढवले जात आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)