सांगली: भाजपचे सांगलीतील माजी खासदार संजय पाटील (Sajay Patil) यांनी राष्ट्रवादीच्या माजी उपनगराध्यक्षाला मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणात भाजपचे सांगलीतील माजी खासदार संजय पाटील (Sajay Patil) यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. कवठेमहांकाळचे माजी उपनगराध्यक्ष अय्याज मुल्ला यांना मारहाण केल्याबद्दल संजय पाटील आणि खंडू होवाळे यांच्यासह पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी संताप व्यक्त केला आहे.


त्यांनी यासंबधी नाव न घेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना लक्ष्य केलं आहे. भाजपचे नेते सागर बंगल्याच्या आशीर्वादाने राज्यभरात दहशत माजवत आहेत. माझी पोलीस प्रशासनाला विनंती आहे आमदार सुमनताई पाटील व रोहित पाटील यांना कायदेशीर सहकार्य करा, अन्यथा ही दहशत मोडून काढण्यासाठी आम्हा सर्वांना तिथं यावं लागेल, असा इशारा देखील त्यांनी यावेळी दिला आहे. रोहित पवार यांनी सोशल मिडियावरती पोस्ट लिहली आहे.


रोहित पवारांची पोस्ट काय आहे?


सांगली जिल्ह्याच्या भाजपच्या माजी खासदारांनी त्यांच्या सहकाऱ्यांसोबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे कवठेमहांकाळ तालुक्याचे नेते आयाज मुल्ला यांना व त्यांच्या कुटुंबीयांना केलेली मारहाण निंदनीय आहे . भाजपचे नेते सागर बंगल्याच्या आशीर्वादाने राज्यभरात दहशत माजवत आहेत. माझी पोलीस प्रशासनाला विनंती आहे #आमदार_सुमनताई_पाटील व #रोहित_पाटील यांना कायदेशीर सहकार्य करा, अन्यथा ही दहशत मोडून काढण्यासाठी आम्हा सर्वांना तिथं यावं लागेल .






नेमकं प्रकरण काय?


भाजपचे माजी खासदार संजयकाका पाटलांनी (Sanjay Patil) समर्थकासह कवठेमहांकाळचे माजी उपनगराध्यक्षांच्या घरात घुसून मारहाण केल्याची घटना शुक्रवारी घडली आहे. मात्र, मारहाण झाल्याची कबुली देत आपल्या स्वीय सहायकाला रात्री मारहाण केल्याचा दावाही माजी पाटील यांनी केला. 


अय्याज मुल्ला यांना वाचवायला आलेल्या आईलाही ढकललं


तर कवठेमहांकाळचे शरद पवार पक्षाचे माजी उपनगराध्यक्ष अय्याज मुल्ला यांनी केलेल्या तक्रारीनुसार माजी खासदार संजयकाका पाटील (Sanjay Patil) यांनी आपल्या समर्थकासह घरात घुसून मारहाण केली. घरातील महिला व मुलांनाही मारहाण केल्याचा दावा त्यांनी केला आहे. मारहाणीपासून वाचवण्यासाठी पुढे आलेल्या 76 वर्षाच्या आईलाही माजी खासदारांनी ढकलून दिले असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.