वर्धा : लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Election 2024) पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात हालचालींना वेग आला आहे. महाराष्ट्रात प्रहार संघटनेचे (Prahar Sanghatana) प्रमुख बच्चू कडू (Bacchu Kadu), स्वराज्य पक्षाचे अध्यक्ष छत्रपती संभाजीराजे (Chhatrapati Sambhajiraje), स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी निर्माण केलेल्या तिसऱ्या आघाडीकडून नेमक्या किती जागा लढविल्या जातात? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
त्यात आता वर्ध्यातील चारही विधानसभा मतदारसंघात तिसऱ्या आघाडीच्या महाशक्तीने लढण्याची तयारी सुरु केल्याचे दिसून येत आहे. वर्धा जिल्ह्यातील आर्वी, देवळी, हिंगणघाट आणि वर्धा या चारही विधानसभा क्षेत्रात तिसऱ्या आघाडीकडून उमेदवार रिंगणात उतरविले जाणार आहे. महायुतीमध्ये असलेली इच्छुक उमेदवारांची गर्दी देखील आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न तिसऱ्या आघाडीकडून केला जाणार आहे.
प्रहारमध्ये अनेक नेत्यांचा होणार पक्ष प्रवेश
आर्वी विधानसभा क्षेत्रात आज मोठ्या संख्येने तिसऱ्या आघाडीतील प्रहारमध्ये पक्ष प्रवेश होणार आहेत. यात आर्वी विधानसभा मतदारसंघातील बीआरएसचे जय बेलखडे यांच्यासह असंख्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून प्रहार जनशक्ती पक्षामध्ये पक्ष प्रवेश केला जाणार आहे. त्यामुळे बीआरएसमधून प्रहारमध्ये जाण्याचा ओघ आता वाढल्याचे चित्र आहे.
तिसऱ्या आघाडीकडून वर्ध्यातील विधानसभा मतदारसंघात चाचपणी
वर्धा जिल्ह्यातील आर्वी, देवळी, हिंगणघाट आणि वर्धा या चारही विधानसभा क्षेत्रात तिसऱ्या आघाडीकडून उमेदवार रिंगणात उतरविले जाणार आहे. यासाठी मतदार संघात चाचपणी देखील केली जात आहे. आता तिसऱ्या आघाडीकडून वर्ध्यातील विधानसभा मतदारसंघातून नक्की कोणाला उमेदवारी मिळणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महाशक्ती म्हणून 288 जागा लढवणार : बच्चू कडू
दरम्यान, काही दिवसांपूर्वी बच्चू कडू यांनी महाशक्ती म्हणून आम्ही संपूर्ण 288 जागा लढवणार, असे वक्तव्य केले होते. छत्रपती संभाजीनगर येथे बोलताना त्यांनी म्हटले होते की, आम्ही राज्याला चांगला पर्याय दिला पाहिजे म्हणून आम्ही तिसरा पर्याय दिलाय. देशात दिल्ली, पंजाब, बिहार याठिकाणी तिसरा पर्याय लोकांनी निवडून दिलाय. त्याचप्रमाणे राज्यातही आम्हालाही लोक साथ देत निवडून देतील. आगामी विधानसभा निवडणुकीत आम्ही महाशक्ती म्हणून संपूर्ण 288 जागा लढवणार आहोत. झेंडे दाखवून निवडणूक लढवणे आता बंद होईल. तसेच हा निर्णय घेत असताना आणि महाशक्ती स्थापन करण्याआधी मी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना भेटलो होतो. फक्त अजित पवार सोबत माझी भेट झाली नाही, असे बच्चू कडू यांनी म्हटले होते.
आणखी वाचा