Mumbai News : अमरावतीमधील (Amravati) आमदार रवी राणा (Ravi Rana) आणि बच्चू कडू (Bacchu Kadu) यांच्यातील वाद मिटवण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या सागर बंगल्यावर बैठक बोलावण्यात आली आहे. आमदार रवी राणा उपमुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी पोहोचले आहेत. परंतु बच्चू कडू देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला जाणार नाहीत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. आमदार रवी राणा यांच्या पत्रकार परिषदेनंतरच बच्चू कडू आपली भूमिका जाहीर करणार आहेत. त्यामुळे रवी राणा आणि बच्चू कडू यांची आजची नियोजित संयुक्त पत्रकार परिषद रद्द झाली आहे.


बच्चू कडू आज (31 ऑक्टोबर) संध्याकाळी अमरावती इथे कार्यकर्त्यांसोबत बैठक घेऊन उद्या (1 नोव्हेंबर) दुपारी अमरावती येथे पत्रकार परिषद घेऊन निर्णय जाहीर करणार आहे. रवी राणा माफी मागणार का याकडे बच्चू कडू यांचं लक्ष आहे. 


वर्षा बंगल्यावरील बैठकीत आमदारांच्या वादावर तोडगा नाही
दरम्यान बच्चू कडू आणि रवी राणा यांच्या वादावर अद्यापही तोडगा निघालेला नाही. या दोन्ही आमदारांमधील वाद मिटवण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मध्यस्थी करत आहेत. परंतु याला अद्याप यश आलेलं नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या वादावर तोडगा काढण्यासाठी दोन्ही नेत्यांना वर्षा बंगल्यावर बोलावलं होतं. वर्षावर काल रात्री तब्बल अडीच तास बैठक झाली. मात्र बैठकीत कोणताही ठोस निर्णय झाला नाही. त्यानंतर आज रवी राणा आणि बच्चू कडू आज सकाळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सागर बंगल्यावर भेट घेणार होते. शिवाय त्यानंतर त्यांची संयुक्त पत्रकार परिषद देखील होणार होती. परंतु केवळ रवी राणा हेच उपमुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी सागर बंगल्यावर पोहोचले आहेत. तर बच्चू कडू मात्र भेटीसाठी जाणार नाहीत. परिणामी नियोजित संयुक्त पत्रकार परिषद रद्द झाली आहे. 


बच्चू कडू आणि रवी राणा यांच्यामधील नेमका वाद काय?
ऑगस्ट महिन्यात अचलपूर मतदारसंघातील एका कार्यक्रमात आमदार रवी राण यांनी बच्चू कडू यांच्याविरोधात एक वक्तव्य केलं होतं. 'मी काही गुवाहाटीला जाणारा आमदार नाही. ना बाप बडा ना भय्या, सबसे बडा रुपय्या' हे या मतदारसंघातल्या आमदाराचं 'स्लोगन' आहे, अशी टीका त्यांनी केली होती. त्याला प्रत्युत्तर देताना बच्चू कडू यांनी रवी राणांविषयी अपशब्दांचा वापर केला आणि त्यानंतर हा वाद चांगलाच वाढत गेला. शिवाय 1 नोव्हेंबरला मोठा धमाका करणार असल्याचं बच्चू कडू म्हणाले होते.