Maharashtra Politics : माजी राज्यमंत्री आणि अचलपूरचे आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) आणि आमदार रवी राणा (Ravi Rana) यांच्यात सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदार रवी राणा यांना रविवारी मुंबईला आपल्या 'वर्षा' निवासस्थानी बोलावले होते. त्या संदर्भात आज दोन्ही नेते आपापली भूमिका मांडणार असल्याची सुत्रांची माहिती आहे. काय घडलं कालच्या बैठकीत?


दोन्ही नेत्यांकडून वाद मिटल्याचं जाहीर करण्याची शक्यता
सुत्रांच्या माहितीनुसार, या संदर्भात वर्षावर तब्बल अडीच तास बैठक झाली, मात्र काय निर्णय झाला? याबाबत माध्यमांना प्रतिक्रिया देण्यास सर्व नेत्यांनी नकार दिल्याचे समजते. आज दोन्ही नेते आपापली भूमिका मांडणार आहेत. या बैठकीमध्ये मंत्री गिरीश महाजन सुद्धा होते. तर आमदार रवी राणा आणि आमदार बच्चू कडू यांच्या मधला वाद मिटला असल्याची माहिती सुत्रांकडून मिळत आहे. आज हा या दोन्ही नेत्यांकडून वाद मिटल्याचं जाहीर करण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. आमदार रवी राणा आणि आमदार बच्चू कडू हे दोन्ही नेते आज सकाळी 9 वाजता 'सागर' बंगल्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून वाद मिटल्याच्या संदर्भात पत्रकार परिषद घेण्याची शक्यता आहे.


मुख्यमंत्र्यांकडून मध्यस्थी


रवी राणा यांनी बच्चू कडू यांच्यावर सत्तेत सहभागी होण्यासाठी पैसे घेतल्याचा आरोप केल्यानंतर या वादाला सुरुवात झाली. यानंतर दोन्ही नेत्यांमधील या वादावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मध्यस्थी करण्याचे ठरवले. त्यासाठी या दोन्ही नेत्यांना मुख्यमंत्र्यांच्या 'वर्षा' या शासकीय निवासस्थानी बोलावण्यात आले. दरम्यान रवी राणा यांनी केलेल्या आरोपांचा आधार घेत आता विरोधकांनी सत्ताधारी आणि बंडखोरी करणाऱ्या आमदारांवर निशाणा साधल्याचे पाहायला मिळाले.


तर एक नोव्हेंबरला आंदोलन करणार - कडू


बैठकीला जाण्यापूर्वी बच्चू कडू म्हणाले होते, सरकार वर नाराजी नाही. रवी राणा यांच्यामुळे वाद झालाय. रवी राणा यांनी माफी मागितली पाहिजे. या बदनामी नंतर समाधानकारक तोडगा निघाला पाहिजे. अन्यथा एक तारखेच्या आंदोलनावर ठाम राहायचे अशी कार्यकर्ता यांची मागणी आहे. बदनामी ही सर्व 50 आमदारांची केली आहे. यावर समाधानकारक तोडगा नाही निघाला तर एक तारखेला आंदोलन करणार असे कडू यांनी म्हटले होते.


बच्चू कडू, रवी राणांमधील नेमका वाद काय?


ऑगस्ट महिन्यात अचलपूर मतदार संघातील एका कार्यक्रमात रवी राणांनी बच्चू कडू यांच्या विरोधात एक वक्तव्य केले होते. 'मी काही गुवाहाटीला जाणारा आमदार नाही. ना बाप बडा ना भैय्या, सबसे बडा रुपय्या' हे या मतदार संघातल्या आमदाराचे 'स्लोगन' आहे, अशी टीका त्यांनी केली होती. त्याला प्रत्यूत्तर देताना बच्चू कडूंनी रवी राणांविषयी अपशब्दांचा वापर केला आणि त्यानंतर हा वाद चांगलाच वाढत गेला.