नागपूर: राज्यात सध्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु असताना माजी गृहमंत्री आणि शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांच्या पुस्तकाची सध्या चांगलीच चर्चा आहे. अनिल देशमुख (Anil Deshmukh) दररोज सोशल मीडियावरुन ‘डायरी ऑफ ए होम मिनिस्टर’ आत्मचरित्रपर या पुस्तकातील काही पानं शेअर करत आहेत. त्यांनी रविवारी पुस्तकातील 'टरबुजा' या प्रकरणाचे पान ट्विट केले आहे. यामध्ये अनिल देशमुख यांनी तुरुंगात आपली कशाप्रकारे उपासमार व्हायची, हे सांगितले आहे. अनेकदा माझे जेवण चिंचुद्री आणि उंदीर (Rats) खाऊन टाकायचे. त्यामुळे मला उपाशी झोपायला लागायचे. रविवारी दुपारी 12 वाजता आमच्या कोठडीचे दरवाजे बंद व्हायचे ते सोमवारी 12 वाजता उघडायचे. त्यामुळे थेट 12 तासांनी मला जेवण मिळायचे. कोठडीत चिंचुद्री आणि उंदरांचा सुळसुळाट असल्याने आपल्याला खूप त्रास सहन करावा लागला, असे अनिल देशमुख यांनी सांगितले आहे. 


अनिल देशमुखांच्या ट्विटमध्ये नेमकं काय म्हटलंय?


तुरुंगात अनेकांना घरचं जेवण दिलं जात असे. मात्र मला घरचं जेवण द्यायला न्यायालयाची परवानगी नव्हती, म्हणून मला तुरुंगतार्ल जेवणच दिलं जायचं. तुरुंगातील जेवण कसं असतं याचा अंदाज वाचक लावू शकतात; मात्र त्यापेक्षाही तुरुंगातील जेवण कितपत सुरक्षित आहे, याची सतत धाकधूक असायची. संपूर्ण तुरुंगात आणि माझ्याही सेलमध्ये उंदीर-चिचुंद्रयांची अगदी भाऊगर्दीच होती. कित्येकदा तर असं व्हायचं की जेवण यायचं आणि मला जेवायला थोडा जरी उशीर झाला, तर तोवर उंदीर-चिचुंद्रया त्यावर तुटून पडलेल्या असायच्या. यामुळे कित्येकदा माझ्यावर उपाशी झोपण्याची पाळीही आली. रविवारी आणि सरकारी सुट्टीच्या दिवशी तर जेवणाची परिस्थिती आणखीच खराब असायची; कारण रविवारी दुपारी 12 वाजता सेलचे दरवाजे जे बंद व्हायचे, ते थेट दुसऱ्या दिवशी 12 वाजता उघडायचे. म्हणजेच रविवारी दुपारी १२ वाजता जे जेवण मिळायचं त्यावरच दुसऱ्या दिवशी जेवण मिळेपर्यंतची वेळ मारून न्यावी लागायची. त्याशिवाय रविवारी दुपारी आलेलं जेवण उरवून उंदीर-चिचुंद्रयांपासून त्याचं रक्षण करण्यासाठी ते बादलीच्या वर ठेवून त्याची राखण करत बसावं लागायचं ते वेगळंच, असा अनुभव अनिल देशमुख यांनी सांगितला आहे.


अनिल देशमुखांनी सांगितली 'टरबुजा' उंदराची गोष्ट


अनिल देशमुख यांच्या या गोष्टीत 'टरबुजा' नावाच्या उंदराचा उल्लेख आहे. त्यांनी म्हटले आहे की,तसे तर तुरुंगात खूपच उंदीर आणि चिंचुद्रया होत्या; मात्र त्यामध्ये एक उंदीर एकदम वेगळा होता. अगदी गलेलठ्ठ. साहजिकच त्यामुळे तुरुंगातील सगळे त्याला 'टरबूजा' म्हणायचे. त्याला कितीही दूर हाकलायचा प्रयत्न केला, तरी तो अशा काही नजरेने आपल्याकडे बघायचा की जणू काही त्याची ती नजर सांगत असायची 'मी पुन्हा येईन... मी पुन्हा येईन... मी पुन्हा येईन...!', असे अनिल देशमुख यांनी आपल्या पुस्तकात नमूद केले आहे.




आणखी वाचा


ठाकरे सरकार पाडण्याचे गलिच्छ राजकारण देवेंद्र फडणवीस यांनी केलंय, माझ्या पुस्तकात पुराव्यांसह संपूर्ण माहिती : अनिल देशमुख