मुंबई: काँग्रेस पक्षाने शनिवारी विधानसभा निवडणुकीसाठी आपल्या पक्षाची तिसरी उमेदवार यादी जाहीर केली. काँग्रेसच्या या तिसऱ्या यादीत (Congress Candidate List) 16 उमेदवारांचा समावेश आहे. यामध्ये प्रसारमाध्यमांच्या व्यासपीठावर काँग्रेसची बाजू हिरीरिने मांडणारे प्रवक्ते आणि निष्ठावंत सचिन सावंत (Sachin Sawant) यांच्या नावाचा समावेश आहे. सचिन सावंत यांना काँग्रेसने अंधेरी पश्चिम विधानसभा मतदारसंघातून (Andheri West constituency) रिंगणात उतरवले आहे. यावर सचिन सावंत यांनी नाराजी दर्शवित मतदारसंघ बदलून देण्याची मागणी केली आहे.


काँग्रेसची उमेदवार यादी जाहीर झाल्यानंतर सचिन सावंत यांनी सोशल मीडियावर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. त्यांनी म्हटले की, मी वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघातून पक्षाकडे उमेदवारी मागितली होती. तिथेच लढावे अशी माझी इच्छा होती. परंतु तो मतदारसंघ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे गेला आहे. मी अंधेरी पश्चिम मतदारसंघातून उमेदवारी मागितली नव्हती. तरी पक्षश्रेष्ठींनी माझ्यावर जो विश्वास दाखवला त्याबद्दल मनापासून धन्यवाद! परंतु मी महाराष्ट्र काँग्रेस पक्षाचे प्रभारी रमेश चेन्नितला यांना  पक्षाने निर्णय बदलावा याकरिता विनंती केली आहे. मी पक्षाचा निष्ठावंत कार्यकर्ता आहे. त्यामुळे पक्षश्रेष्ठी माझ्या विनंतीचा सहानुभूतीपूर्वक विचार करतील ही आशा बाळगतो, असे सचिन सावंत यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.


मी मतदारसंघ बदलून देण्याचा निर्णय हायकमांडवर सोपवला आहे. याठिकाणी माझ्याऐवजी दुसऱ्या कार्यकर्त्याला संधी मिळावी, अशी माझी इच्छा आहे. यामध्ये नाराजीचा कोणताही भाग नाही. मी काँग्रेसचा निष्ठावंत कार्यकर्ता आहे. केवळ मी जिथून निवडणूक लढण्याची तयारी केली होती, तिकडून मला संधी मिळावी, एवढीच माझी अपेक्षा असल्याचे सचिन सावंत यांनी म्हटले. सचिन सावंत यांनी मतदारसंघ बदलून मागितल्याने काँग्रेस नेतृत्व याबाबत काय निर्णय घेणार, हे पाहावे लागेल. 




अंधेरीतून महायुतीचा उमेदवार कोण?


अंधेरी पश्चिम विधानसभा मतदारसंघातून भाजपचे अमित साटम हे महायुतीचे उमेदवार आहेत. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत अमित साटम यांनी 65,615 मते मिळवत काँग्रेसच्या अशोक जाधव यांना पराभवाची धूळ चारली होती. ते दोनवेळा या मतदारसंघातून निवडून आले आहेत. त्यामुळे आता काँग्रेस नेतृत्व सचिन सावंत यांना अंधेरी पश्चिम मतदारसंघातून लढण्याचा आदेश कायम ठेवणार की या मतदारसंघातील उमेदवार बदलणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. 


आणखी वाचा


काँग्रेसची 16 उमेदवारांची तिसरी यादी जाहीर,माणिकराव ठाकरे ते सचिन सावंतांना उमेदवारी; सांगली-कोल्हापुरात कोणाला संधी?