Rajendra Raut: सोलापूर : गेल्या काही दिवसांपासून मनोज जरांगे (Manoj Jarange) यांच्यावर थेट तोफ डागल्यामुळे राज्यभर चर्चेत असलेले बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांनी आजपासून ठिय्या आंदोलन सुरु केलं आहे. मराठा समाजाला (Maratha) ओबीसीतून आरक्षणास पाठिंबा देण्यासाठी विशेष अधिवेशन बोलवावे, अशी मागणी करत आमदार राऊत (Rajendra Raut) यांनी आजपासून ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. राज्यातील जास्तीत जास्त आमदारांनी विशेष अधिवेशन घेण्यासाठी मागणी केल्यास अध्यक्षांना अधिवेशन घ्यावेच लागेल. त्यासाठी समाज बांधवांनी सर्व आमदारांकडे जाऊन अध्यक्षांना पत्र देण्याची विनंती करण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे. तसेच, जर सर्वच पक्षांनी मराठा समाजाला ओबीसीतून (OBC) आरक्षण देण्यास विरोध केला, तर सरळ 5 कोटी मराठ्यांनी विधानसभेच्या निवडणुकीवरच बहिष्कार घालावा, असे आवाहनही आमदार राऊत यांनी ठिय्या आंदोलनादरम्यान केलं आहे. मात्र, सत्ताधारी पक्षांसोबत असलेल्या आमदारांचे हे ठिय्या आंदोलन राज्यात चर्चेचा विषय बनलं आहे.
मी बार्शीचा अपक्ष आमदार असून माझे विरोधक महाविकास आघाडीत असल्याने गेली अडीच वर्ष मी विरोधात होतो, सत्ता आल्यानंतर मी एकनाथ शिंदेंच्या सरकारसोबत असलो तरी वयाच्या सोळाव्या वर्षापासून मी मराठा आंदोलनात काम केलेली आहे. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यासंदर्भात जे पक्ष आपली भूमिका स्पष्ट करणार नाहीत, त्यांच्या विरोधात सर्व मराठा समाजाने मतदान करावे असे आवाहन राऊत यांनी केले. त्यानंतरच प्रत्येक प्रत्येक पक्षाची अंधारातील भूमिका व खरी भूमिका उघड होऊन दूध का दूध व पाणी का पाणी होऊन जाईल, असेही राऊत यांनी म्हटलं. तसेच, राजकारणासाठी मराठा समाजाचा वापर करुन पोळी भाजणे बंद करावे, असा टोलाही विरोधकांना लगावला. दरम्यान, सर्वच पक्षांनी जर मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यास विरोध केला तर सरळ पाच कोटी मराठ्यांनी विधानसभेच्या निवडणुकीवरच बहिष्कार घालावा अशी ही मागणी राऊत यांनी केली.
सगळ्या आमदारांकडून पत्र घ्या
स्वतःच्या राजकारणाची पोळी भाजण्यासाठी कोणीही मराठा समाजाला झुलवत ठेवू नये व महाराष्ट्राचा मणिपूर करु नये. सर्वच राजकीय पक्षांनी अंधारात भूमिका न मांडता विधानसभेचे एक दिवसीय अधिवेशन बोलवून त्यात आपली भूमिका स्पष्ट करावी. जर मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण द्यायचं असेल तर तसे सांगावे. मात्र, समाजाला झुलवणे बंद करावे. त्यासाठी, राज्यातील सगळ्या आमदारांकडून पत्र घ्या आणि विशेष अधिवेशन बोलवण्याची मागणी करा, बाकी काहीही बोलू नका असा टोलाही राऊत यांनी नाव न घेता मनोज जरांगेंना लगावला.
सर्वपक्षीय नेत्यांना पत्र
मी देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्यासह शरद पवार, उद्धव ठाकरे आणि नाना पटोले यांनादेखील पत्र लिहून विशेष अधिवेशनाची मागणी केली आहे. बहुतांश सर्वच पक्षांना आणि आमदारांना माझी पत्र गेली असून आता त्यांनी विधानसभा अध्यक्षांना विशेष अधिवेशन घेण्यासाठी पत्र पाठवायचे आहे. मी मराठा समाजाबद्दल एखादा विचार मांडला तर कोणाला राग यायचे काय कारण जरांगे कोणती बाजू घेतात ते सर्वांना माहीत आहे, आता मी माझी बाजू स्पष्ट केलेली असून आता त्यांनी आमदारांकडून विशेष अधिवेशनासाठी पत्र घ्यावीत, असे आवाहनही राऊत यांनी केले आहे. राज्यातील जास्तीत जास्त आमदारांनी विशेष अधिवेशन घेण्यासाठी मागणी केल्यास अध्यक्षांना अधिवेशन घ्यावेच लागेल, यासाठी समाज बांधवांनी सर्व आमदारांकडे जाऊन अध्यक्षांना पत्र देण्याची विनंती करण्याचं आवाहनही राऊत यांनी केले. दरम्यान, 1 ते 5 ऑक्टोबर दरम्यान आचारसंहिता लागणार आहे, त्यामुळे 20 दिवस आपल्या हातात आहेत, सरकारने विशेष अधिवेशन बोलवावे, असेही राऊत यांनी म्हटले.