Raosaheb Danve on CAA : "मुस्लिम लोकांनी आपल्या कामाकडे, आपल्या जिल्ह्याकडे आणि आपल्या तालुक्याकडे पाहावे. CAA ला घाबरू नका. सीएएच्या कायद्याबद्दल उगाच भीती निर्माण केली जात आहे. तुमच्या केसालाही धक्का लागणार नाही", असा शब्द केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी मुस्लिम समाजाला दिला आहे. जालन्यातील भोकरदन येथे भाजप स्थापना दिना निमित्त ते स्थानिक कार्यकर्त्यांना संबोधित करत असताना त्यांनी मुस्लिम समाजाला आवाहन केलं.
सीएए कायद्याबद्दल उगाच भीती घातली जात आहे
रावसाहेब दानवे म्हणाले, मुसलमान लोकांनी आपल्या कामाकडे, आपल्या जिल्ह्याकडे आणि तालुक्याकडे पाहाव. तुमच्या केसालाही धक्का लागणार नाही. काँग्रेसच्या भरोशावर बसू नका. सीएए कायद्याबद्दल उगाच भीती घातली जात आहे. तुमच्या केसालाही धक्का लागणार नाही. त्यामुळे मुसलमानांनी काँग्रेसच्या भरवशावर राहू नये. अर्जुनराव माझे मित्र आहेत आणि आमचे पक्ष 1990 पासून सोबत मित्र म्हणून काम करत आहेत. आम्ही एकमेकांचे जवळचे,आम्ही 15 दिवसांपूर्वी सोबत होतो. आमच्यात कुठल्याही प्रकारचा वाद नाही. संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या पक्षाचे कार्यक्षेत्र फक्त मुंबई,त्या बाहेर त्यांचं काही नाही. राज्यात भाजप 45,तर देशात 400 पार जाणार, असा दावाही रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी केला.
रावसाहेब दानवेंना सहाव्यांदा उमदेवारी
भारतीय जनता पक्षाने रावसाहेब दानवे यांना सहाव्यांदा उमेदवारी जाहीर केली आहे. मात्र, यंदाच्या निवडणुकीत दानवे यांच्यापुढे मोठी आव्हान असणार आहेत. मराठा आरक्षणाचा मुद्दा जालन्यासह मराठवाड्यात तापलेला आहे. त्याचा परिणाम निश्चितपणे निवडणुकीवर होऊ शकतो. यापूर्वी सलग 5 वेळेस त्यांनी जालनातून बाजी मारली आहे. त्यामुळे मतदारांमध्ये अँटी इन्कबंसीही असू शकते. शिवाय, 2019 मध्ये ठाकरेंची ताकद दानवेंसोबत होती. आता ठाकरेंच्या शिवसेनाचा मतदार दानवेंच्या पाठिशी नसणार आहे.
महाविकास आघाडीकडून उमेदवार जाहीर नाहीच
भाजपने रावसाहेब दानवे यांना उमेदवारी दिली आहे. मात्र महाविकास आघाडीकडून दानवेंशी दोन हात करण्यासाठी कोण लढणार? हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, वंचित बहुजन आघाडीने जालन्यात आपला उमेदवार जाहीर केला आहे. वंचितने प्रभाकर बकले यांना उमेदवारी जाहीर केली आहे. मनोज जरांगे यांना पाठिंबा दिल्याने वंचितला या मतदारसंघात फायदा होईल, असं बोललं जात आहे. शिवाय तिरंगी लढतीचा फायदा कोणला होणार ? याकडेही सर्वांचे लक्ष आहे.
इतर महत्वाच्या बातम्या