Raosaheb Danve on Eknath Shinde : भाजपच्या दबावतंत्रामुळे एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेला उमेदवार बदलावे लागत असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु आहे. दरम्यान, भाजप नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve)  यांनी याबाबत भाष्य केलं आहे. "उमेदवार बदलण्यासाठी भाजपचे प्रेशर आहे, असं म्हणता येत नाही.निवडून येणे हेच आमचं पहिले सूत्र आहे", असं रावसाहेब दानवे यांनी स्पष्ट केलं. ते जालन्यात (Jalna) बोलत होते. 


उमेदवार निवडणूक लढण्यास नकार देतात


रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) म्हणाले, काही बदललेले उमेदवार वाईट आहेत म्हणून बदलले नाहीत. उमेदवारांनी स्वतःहून माझ्या ऐवजी इतरांना उमेदवारी द्या,अशी मागणी केली. त्यामुळे निर्णय घेण्यात आला. उमेदवारी बदल हा त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे. त्यांचा अंतर्गत विषय भाजपशी संबंध नाही. उमेदवार बदलासाठी काही वेळा सर्व्हे असतात, काही वेळा कार्यकर्त्यांचं जनतेचं मत असत,कधी कधी  स्वतः होऊन उमेदवार निवडणूक लढण्यास नकार देतात. 


आमच्यात कुठल्याही प्रकारचा वाद नाही


पुढे बोलताना रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) म्हणाले, आम्ही एकमेकांचे जवळचे,आम्ही 15 दिवसांपूर्वी सोबत होतो. अर्जुनराव माझे मित्र आहेत आणि आमचे पक्ष  1990 पासून सोबत मित्र म्हणून काम करत आहेत. आमच्यात कुठल्याही प्रकारचा वाद नाही. संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या पक्षाचे कार्यक्षेत्र फक्त मुंबई,त्या बाहेर त्यांचं काही नाही. राज्यात भाजप 45,तर देशात 400 पार जाणार, असा दावाही रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी केला. 


एकनाथ शिंदेंनी कोणता उमेदवार बदलला?


एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने हिंगोलीचे विद्यमान खासदार हेमंत पाटील (Hemant Patil) यांना पुन्हा एकदा उमेदवारी जाहीर केली होती. मात्र, हेमंत पाटील (Hemant Patil) यांच्या उमेदवारीवर भाजप नेत्यांनी विरोध केला. भाजपकडून उमेदवार बदलासाठी एकनाथ शिंदे यांच्यावर दबाव टाकला, अशी चर्चाही रंगल्या होत्या. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी हेमंत पाटील यांच्याऐवजी आता बाबुराव कदम कोहळीकर यांना उमेदवारी जाहीर केली. शिंदे यांच्याकडून  पहिल्यांदाच  जाहीर झालेल्या उमेदवाराची उमेदवारी रद्द करण्यात आली होती. त्यानंतर एकनाथ शिंदे यांची भाजपकडून कोंडी करण्यात येत आहे, अशा चर्चा रंगू लागल्या आहेत. 


इतर महत्वाच्या बातम्या 


Nana Patole on Prakash Ambedkar : अजूनही वेळ गेलेली नाही, किती जागा पाहिजे सांगा, अकोल्यात जाऊन नाना पटोलेंची प्रकाश आंबेडकरांना ऑफर