Raosaheb Danve on Arjun Khotkar, जालना : मी राजकारणातली सासू आहे आणि अर्जुन खोतकर माझी सून आहे, अशी मिश्किल टिप्पणी जालना लोकसभा महायुतीचे उमेदवार रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी केली आहे. शिंदे गटाचे नेते अर्जुन खोतकर (Arjun Khotkar) आणि रावसाहेब दानवे यांचा वाद महाराष्ट्राला नवा नाही. मात्र, लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर ती खोतकर आणि दानवे यांच्यामध्ये निर्माण झालेला दुरावा दूर झालाय. दोन्हीही नेते आज (दि.5) प्रचारासाठी एकत्रित दिसले आहेत. जालन्यातील गोलापांगरी येथे सभेदरम्यान रावसाहेब दानवे यांनी हे वक्तव्य केले.
पुढच्या वेळी अर्जुन खोतकर यांना खासदार करा आणि मला आमदार करा
रावसाहेब दानवे म्हणाले, वाटत असेल तर पुढच्या वेळी अर्जुन खोतकर यांना खासदार करा आणि मला आमदार करा असे आवाहनही रावसाहेब दानवे यांनी भाषणातून केले आहे. मी राजकारणातली सासू आहे. अर्जुनराव माझी सून आहेत. एकदा सुनांच्या हातात कारभार गेला की सासूला फक्त आणायच सांगतात, वाटायला सुना असतात. वाटत असेल तर पुढच्या वेळी अर्जुन खोतकर यांना खासदार करा आणि मला आमदार करा, असंही रावसाहेब दानवे यांनी सांगितलं.
रावसाहेब दानवेंविरोधात काँग्रेसकडून कल्याण काळे मैदानात
जालना लोकसभा मतदारसंघातून भाजपने विद्यमान खासदार रावसाहेब दानवे यांना उमेदवारी दिली आहे. तर काँग्रेसने त्यांचे पारंपारिक प्रतिस्पर्धी असलेल्या कल्याण काळे यांना उमेदवारी दिली आहे. दोघांमध्ये तगडी फाईट होणार असतानाच अपक्ष उमेदवाराने शड्डू ठोकला, त्यामुळे जालन्यात तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे. वकिल गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडी फोडण्याचा आरोप असलेले आणि आरक्षणासाठी स्वत:ची गाडी जाळणाऱ्या मंगेश साबळे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला आहे. दरम्यान, मनोज जरांगे यांच्यावर मराठा आंदोलक जरांगे यांच्या नावाचा वापर केल्याचा आरोप झाला होता. त्यानंतर मंगेश साबळेंनी जरांगेंनी मला पाठिंबा दिलेला नाही, आम्ही त्यांच्या नावाचा वापर करणार नाही, असे स्पष्टीकरण दिले होते.
मनोज जरांगेंमुळे कोणाला फटका बसणार?
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा जालना लोकसभा मतदारसंघात असलेला प्रभाव रावसाहेब दानवे यांच्यासाठी डोकेदुखी ठरु शकतो. कारण मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी वारंवार आंदोलने केले. त्यानंतर जरागेंनी फडणवीसांवर खळबळजनक आरोपही केले होते. मात्र, जरांगेंविरोधात एसआयटी स्थापन केल्यामुळे मराठा समाज नाराज झाला होता. त्यामुळे जरांगेंवर चौकशी समिती नेमल्याने भाजपला त्याचा मोठा फटका बसू शकतो, असे बोलले जात आहे. मात्र, दुसरीकडे मंगेश साबळेंनी मतदान मिळवले, तर त्याचा फटका काँग्रेस उमेदवाराला बसेल, असा अंदाजही व्यक्त करण्यात येत आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
''महिलांची डोकी फुटली तेव्हा निषेधसुद्धा नाही, पण बायको उमेदवार असल्याने मनोज जरांगेंची भेट''; ओमराजेंचा घणाघात