सिंधुदुर्ग: ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांची काल सावंतवाडीत जाहीर सभा झाली. यावेळी दीपक केसरकर (Deepak Kesarkar) आणि नारायण राणे (Narayan Rane) मंत्रिपदासाठी आणि स्वार्थासाठी एकत्र आले असा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला. आदित्य ठाकरेंच्या या विधानावर शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी पलटवार केला आहे.  


आदित्य ठाकरे यांना कमी वयात मंत्रीपद मिळालं असून त्यांनी ते मंत्रीपद जनतेसाठी विशेषतः कोकणच्या जनतेसाठी वापर करू शकले नाही. आम्ही कायम भांडत रहावं आणि कोकण विकासापासून दूर राहावं असं आदित्य ठाकरेंना वाटतं. कारण त्यांना कोकणाशी काही देणं घेणं नाही. आम्ही भांडायच आणि तुम्ही त्याची राजकीय पोळी भाजणार, हे आता विसरा असं प्रत्युत्तर दीपक केसरकर यांनी दिलं. 


कोकणात मायनिंग आणून कोकण भकास केलं जातं आहे असा आरोप राणे, केसरकर यांच्यावर आदित्य ठाकरे यांनी केला होता. यावर बोलताना दीपक केसरकर यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्या हा इको सेन्सिटिव्ह जिल्हा झाला, त्यामुळे मायनिंग या जिल्ह्यात येऊ शकत नाही. राहुल गांधी यांच्या नादी लागून काही पण बोलून, खोटं बोलून आपल अज्ञान आदित्य ठाकरे प्रदर्शित करत आहेत, अशी टीका केसरकर यांनी केली आहे.


कुबड्यांच्या ताकदीवर तुम्ही गमश्या मारू नका-


एकेकाळी शिवसेना स्वत:च्या जीवावर लढायची, मात्र आता राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या कुबड्या घेऊन निवडणुक लढवावी लागते अशी टीका दीपक केसरकर यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे. त्यांच्या कुबड्यांच्या ताकदीवर तुम्ही गमश्या मारू नका. बाळासाहेब ठाकरे एकटे निवडणूक लढवायचे, तुम्ही एकटे लढा तुमची ताकद समजेल. काँगेस, राष्ट्रवादीच्या जीवावर आम्हाला धमकी देता. तुम्ही आमची बदनामी करत महाराष्ट्र माफ करणार नाही, असंही दीपक केसरकर म्हणाले.


...म्हणून उद्धव ठाकरे यांनी माफी मागितली


नारायण राणे शिवसेना सोडून गेल्यानंतर जिल्ह्यातील तुमच्या शिवसेनेला किती मतं होती ते बघा. 40 ते 45 हजार मतं संपुर्ण जिल्ह्यात होती, मात्र मी शिवसेनेत आलो तेव्हा दीड पावणे दोन लाख मत झाली. तुम्हाला बोलायला काही वाटत नाही का? असा प्रश्न दीपक केसरकर यांनी उपस्थित केला. भाजपा मला कॅबिनेट मंत्री करणार होते. मात्र मी ते सोडून बाळासाहेबांचे विचार आत्मसात करून शिवसेनेत आलो. मंत्री केलं नाही, म्हणून उद्धव ठाकरे यांनी माफी मागितली, असा खुलासाही दीपक केसरकर यांनी केला. 


तेव्हा या जिल्ह्यात कोणी पेट्रोल देत नव्हतं...


जेव्हा राणे शिवसेना सोडून गेले तेव्हा या जिल्ह्यात कोणी पेट्रोल देत नव्हत, हॉटेल मिळत नसल्याने कार्यकर्त्यांच्या घरी राहावं लागत होतं हे विसरलात का? असा प्रश्न केसरकरांनी उद्धव ठाकरे यांना केला आहे. राणेंच्या द्वेषासाठी माझी लढाई नव्हती, तत्वासाठी होती. राणेंचे आणि माझे व्यक्तिगत सबंध खूप चांगले होते. कोकणच्या हिताच्या गोष्टीसाठी आम्ही कोकणी माणस एकत्र येणार. विकासाच राजकारण करा असा हल्लाबोल देखील दीपक केसरकरांनी ठाकरेंवर केला आहे.


राज्यात एक सर्वात मोठा प्रकल्प येणार-


पावणे चार कोटीची गुंतवणूक महाराष्ट्रात आली, इतर चार राज्यांची एकूण गुंतवणूक महाराष्ट्रा एवढी होत नाही आहे. ती गुंतवणूक गुजरात ला नेली का? फक्त गुजरात गुजरात करायचं, आता राज्यात एक सर्वात मोठा प्रकल्प येत आहे तेव्हा सर्वांची तोंड बंद होतील असा दावा दीपक केसरकर यांनी केला आहे.