Ranjitsinh Mohite Patil : माढा लोकसभा (Madha Loksabha) मतदारसंघात भारतीय जनता पक्षाने मोहिते पाटील घराण्याला डावलून विद्यमान खासदार रणजित नाईक निंबाळकर यांना मैदानात उतरवलं. त्यानंतर मोहिते पाटील कुटुंबिय चांगलेच नाराज झाले. धैर्यशील मोहिते पाटील यांनी भाजप सदस्यत्वाचा राजीनामा देत थेट शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. दरम्यान, प्रवेश करताच त्यांना माढा लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली. दरम्यान, या सर्व घडामोडींपासून माझी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचे सुपूत्र आणि भाजपचे विधानपरिषदेचे आमदार रणजितसिंह मोहिते (Ranjitsinh Mohite Patil) पाटील दूरच आहेत. अद्याप कुटुंबातील सदस्यांनी दिलेल्या निर्णयावर कोणतीही प्रतिक्रिया देखील दिलेली नाही. शिवाय, त्यांना भाजपनेही प्रचार यंत्रणेत सामावून घेतलेले नाही. शिवाय ते धैर्यशील मोहितेंच्या प्रचारातही सामील झालेले नाहीत. 


2019 मध्ये केला होता भाजपात प्रवेश 


रणजितसिंह मोहिते पाटील यांनी 2019 मध्ये भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता. मात्र, विजयसिंह मोहिते पाटील यांनी पक्ष प्रवेश केला नाही, पण शरद पवारांच्या राष्ट्रवादीपासून दूर राहिले. मी कोठेच गेलेलो नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी डिसेंबर 2020 मध्ये दिली होती. मात्र, रणजितसिंह मोहिते भाजपात सक्रिय होते. त्यांना भारतीय जनता पक्षाने विधानपरिषदेवर संधी दिली होती. दरम्यान, गेल्या 5 वर्षातही राज्याच्या राजकारणात मोहिते पाटील घराण्याचे नाव शांतच होते. मात्र, धैर्यशील यांच्या प्रवेशाने ते चांगलेच चर्चेत आले. मात्र, रणजितसिंह मोहिते (Ranjitsinh Mohite Patil) पाटील पुढे कोणता निर्णय घेणार हे अद्याप समजू शकलेले नाही. जयसिंह मोहिते म्हणाले त्याप्रमाणे ते भाजपातच राहणार की, वेगळा निर्णय घेणार हे अद्याप अस्पष्टच आहे. 


मोहिते पाटील कुटुंबियांची 5 वर्षानंतर घरवापसी


मात्र, धैर्यशील मोहिते पाटलांचा राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रवेश हा विजयसिंह मोहिते पाटील यांच्या संमतीनेच झाला असल्याचे खुद्द शरद पवारांनीच स्पष्ट केले आहे. त्यामुळे मोहिते पाटील कुटुंबियांनी 5 वर्षानंतर घरवापसी केलीये, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. मात्र, रणजितसिंह मोहिते (Ranjitsinh Mohite Patil) पुढील काळात कोणता निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष आहे. सध्यातरी भाजपने धैर्यशील मोहितेंना पराभूत करण्यासाठी संपूर्ण ताकद पणाला लावली आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या 


Uddhav Thackeray on PM Modi : भ्रष्टाचार केलेल्या माणसाला आपल्या पक्षात घेतात आणि मोदीची गॅरेंटी म्हणतात, शेतकऱ्यांचे अश्रू पुसायला कधी आले नाहीत, उद्धव ठाकरेंचा पीएम मोदींवर कडाडून हल्लाबोल