Ranjeetsinha Naik-Nimbalkar on Madha Loksabha : मोहिते पाटील (Mohite Patil) आणि उत्तम जानकर (Uttam Jankar) यांची युती हि अनैसर्गिक असल्याने दोन्ही बाजूचे कार्यकर्ते नाराज आहेत. याचा फायदा आपल्यालाच मिळणार असल्याचा दावा भाजप उमेदवार, खासदार रणजित निंबाळकर यांनी केला. माढा तालुक्यात प्रचार दौऱ्यावेळी त्यांनी आज (दि.21) एबीपी माझाशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. 


गेल्यावेळी मिळालेले लीड हे फक्त मोहिते आणि जानकर यांचे नव्हते


रणजित निंबाळकर म्हणाले, गेल्यावेळी मिळालेले लीड हे फक्त मोहिते आणि जानकर यांचे नव्हते. परिसरातील 70 ते 80 हजार मते कायम भाजपसोबत कायम राहणार असल्याचेही रणजित निंबाळकर म्हणाले आहेत. देशाचे पंतप्रधान 30 एप्रिल रोजी सकाळी सोलापूर येथे व दुपारी माळशिरस येथे विराट सभा घेणार आहेत. गेल्यावेळी पेक्षाही यावेळचे सभा मोठी असेल, असंही निंबाळकर यांनी स्पष्ट केलं आहे. 


मोहिते पाटलांकडून भाजपला टोपी घालण्याचे काम 


निंबाळकर पुढे बोलताना म्हणाले, काही दिवसापूर्वी उत्तम जानकर हे देशातील सर्वात चांगल्या खासदारांपैकी निंबाळकर हे असल्याचा दावा करीत होते. स्वातंत्र्यकाळापासून कायम दुष्काळी असणाऱ्या 22 गावांना पाणी देण्यासाठी काढलेले 980 कोटीचे टेंडर असेल, नीरा योजनेत 16 दुष्काळी गावांचा समावेश असेल , रेल्वेचा प्रश्न असेल किंवा रस्त्यांचे जाळे उभे करण्याचा विषय असेल या सर्व कामे मंजूर करताना उत्तम जानकर हे सोबत होते. मात्र भाजप सोबत असल्याचे दाखवताना मोहिते पाटील हे वर्षभरापासून भाजपाला टोपी घालण्याचे काम करीत असल्याचे उत्तम जानकर म्हणत होते, असा दावा निंबाळकर यांनी केलाय. 


जानकर आणि मोहिते पाटलांचे कार्यकर्ते दुखावले 


जानकरांनी काय निर्णय घ्यायचा म्हणून कार्यकर्त्यांना बोलावले. मात्र, मोहिते पाटलांसोबत जायचे,आधीच ठरवले होते. त्यामुळे जानकर आणि मोहिते पाटलांचे कार्यकर्ते दुखावले आहेत, असं निंबाळकर यांनी म्हटलं आहे. गेल्या अनेक वर्षात जानकर -मोहिते वादात अनेक कुटुंब बेचिराख झाली. केसेस अंगावर घेतलेले मोहिते विरोधक उत्तम जानकर यांच्या मागे जाण्यास तयार नाहीत. काही दिवसांत तुमच्यासमोर येईल, असंही निंबाळकर यांनी म्हटलं आहे.   मोहिते पाटील हे कधीही शिवरत्नवरची सत्ता गरुड बंगल्यात देणार नाहीत याची जाणीवही जानकरांना लवकरच येईल असा टोलाही निंबाळकर यांनी लगावला. खरतर उत्तम जानकर यांनी सभेत धैर्यशील मोहिते पाटील यांच्यावर दोन दिवसात गंभीर गुन्हा दाखल होईल, असे सांगत मोहिते पाटील यांच्या बदनामीलाच सुरुवात केल्याचा टोलाही लगावला. 


इतर महत्वाच्या बातम्या


अजितदादांच्या उमेदवाराला लीड देण्यासाठी फडणवीसांच्या आमदारांमध्ये पैज, ओमराजेंविरोधात दोघांनी दंड थोपटले