धाराशिव : भाजपचे तुळजापूरचे आमदार राणा जगजितसिंह पाटील (Ranajagjitsinha Patil) यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांची भेट घेतली असून त्यांच्या तब्येतीची विचारपूसही केली. राणा जगजितसिंह यांनी यावेळी जरांगे पाटलांना कवड्याची माळ आणि तुळजाभवानीची प्रतिमाही भेट दिली. मराठा आरक्षण आंदोलनावेळी राणा जगजितसिंह यांनी मनोज जरांगे यांच्यावर टीका करत त्यांचा बोलवता धनी कुणी वेगळाच असल्याचा आरोप केला होता. आता त्यांनी जरांगेंची भेट घेतल्यानंतर त्यामागे धाराशिव लोकसभा मतदारसंघातील राजकीय गणित असल्याची चर्चा सुरू आहे.


राज्यात सध्या लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्यासाठी प्रचार सुरू असून धाराशिवसाठी 7 मे रोजी मतदान होणार आहे. दुसऱ्या टप्प्यात मराठवाड्यातील परभणी, हिंगोलीसह इतर काही मतदारसंघांमध्ये मतदान पार पडलं. त्यामध्ये मराठा आंदोलनाचा मोठा आणि छुपा परिणाम झाल्याची चर्चा आहे. आता तिसऱ्या टप्प्यासाठी धाराशिवमध्ये मतदान होणार असून मराठा समाजाच्या नाराजीचा फटका बसू नये म्हणून भाजपचे आमदार राणा जगजितसिंह यांनी मनोज जरांगे यांची भेट घेतल्याची चर्चा सुरू आहे. 


मनोज जरांगेंचा बोलवता धनी वेगळाच, राणांची टीका


मनोज जरांगे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर टीका केल्यानंतर भाजपचे तुळजापूरचे आमदार राणा जगजितसिंह यांनी मनोज जरांगेंना प्रत्युत्तर दिलं होतं. एक व्हिडीओ शेअर करत राणा जगजितसिंह म्हणाले होते की, मनोज जरांगे यांनी सर्व मर्यादा ओलांडल्या असून त्यांनी बोलताना तारतम्य बाळगावं. त्याचवेळी त्यांनी गरजवंतत मराठ्यांसाठी लढणाऱ्या नेत्याने सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. तो नेता ज्या पद्धतीने बोलला ते दुर्दैवी आणि निंदनीय आहे. देवेंद्र फडणीसांनी मराठा समाजासाठी केलेले काम हे सर्वांना माहिती आहे. त्यांनी मराठ्यांना आरक्षण दिलं, अनेक सुविधा प्राप्त करून दिल्या. त्यांच्याबद्दल मनोज जरांगे यांनी जी भाषा वापरली ती चुकीची आहे. 


सध्या मराठा आंदोलनाचं स्वरूप काहीसं वेगळं वाटतंय, मनोज जरांगेंचा बोलवता धनी कुणी वेगळााच असल्याची टीका राणा जगजितसिंह यांनी केली होती.


धाराशिवमध्ये भाजपसमोर मोठं आव्हान


धाराशिव लोकसभेसाठी येत्या 7 मे रोजी मतदान होणार असून त्या ठिकाणी विद्यमान खासदार ओमराजे निंबाळकर विरुद्ध राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून अर्चना पाटील निवडणुकीच्या रिंगणात आहेत. धाराशिवमध्ये ओमराजे निंबाळकरांचं पारडं तुलनेनं जड असल्याची चर्च आहे. अर्चना पाटील यांच्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सभा घेतली आहे, त्यामुळे राजकीय गणित काही प्रमाणात बदलण्याची शक्यता आहे.


मराठा आरक्षणाचा छुपा जोर


मराठवाड्यामध्ये मराठा आंदोलनाचा निवडणुकीवर छुपा परिणाम असल्याचं चित्र आहे. मनोज जरांगे यांनी महायुती किंवा महाविकास आघाडीला पाठिंबा दिला नाही. तरीही आरक्षणाच्या विरोधात बोलणाऱ्यांना पाडा, यावेळी कुणाला जिंकवण्यासाठी नव्हे तर पाडण्यासाठी मतदान करा असा आदेश दिला आहे. त्यामुळेच अनेकांचे धाबे दणाणले असल्याचं चित्र आहे. 


मराठा आंदोलकांचा असलेला प्रभाव लक्षात घेता आधी जरांगेंवर टीका करणारे राणा जगजितसिंह आता त्यांच्या तब्येतीची चौकशी करण्यासाठी गेल्याची चर्चा आहे. 


ही बातमी वाचा: