पुणे : शरद पवार (Sharad Pawar) गटाचे खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) भाजपचं (BJP) कमळ (Lotus) हाती घेऊन, लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election 2024) उभं राहायला इच्छुक होते, असा गौप्यस्फोट भाजपचे आमदार प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी केला आहे. हा आरोप करताना शिरूर लोकसभेत अमोल कोल्हेच्या नाटकाचा शेवटचा प्रयोग आहे. पाच वर्षे कोल्हेंनी राजकीय नाटकं केली, आता त्यांनी त्यांचा धंदा पाहावा, अशी खोचक टीका ही दरेकर यांनी केली आहे. शिरूर लोकसभेत महायुतीचे उमेदवार शिवाजी आढळरावांच्या प्रचारासाठी प्रवीण दरेकर शिरुर येथे आले होते. शिरुरच्या सभेत त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.
अमोल कोल्हेंनी मानले प्रवीण दरेकरांचे आभार
शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे भाजपचं कमळ हाती घेऊन, लोकसभा निवडणुकीत उभं राहायला इच्छुक होते, असा गौप्यस्फोट भाजपचे आमदार प्रवीण दरेकरांनी केला. आता दरेकरांचा हा गौप्यस्फोट कोल्हेंनी खोडून काढला आहे. दरेकरांकडे इतकी चांगली विनोद बुद्धी आहे. याची मला कल्पना नव्हती. मात्र त्यांच्या या वक्तव्यानं मी स्वच्छ प्रतिमेचा आहे, याचं सर्टिफिकेट दरेकरांनी दिलं. असं म्हणत अमोल कोल्हेनी दरेकरांचे आभार मानले.
अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
प्रवीण दरेकरांकडे एवढी चांगली विनोदबुद्धी असेल, याची मला कल्पना नव्हती. तशी गोष्ट असेल तर, मी प्रवीण दरेकरांचे आभार मानतो. कारण, आजकाल लोकांमध्ये अशी चर्चा आहे की, भ्रष्टाचाऱ्यांचा एकच नारा, तुरुंगापेक्षा भाजप बरा, असा एक नारा दिला जातो. त्या पात्रतेमध्ये मी बसत नाही, त्यामुळे दरेकरांना मी फीट वाटलो नसेल, माझ्यावर भ्रष्टाचाराचे आरोप नाहीत, म्हणून मी दरेकरांना फीट वाटलो नसेल. सध्या जे कोणी त्यांच्या जवळ जात आहेत, त्यांच्यावर काही ना काही आरोप आहे. दरेकरांनी मी स्वच्छ आहे, याचं सर्टिफिकेट दिल्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानतो, असं अमोल कोल्हे यांनी म्हटलं आहे.