मुंबई : विदर्भात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Shivsena) पक्षाच्यावतीने काही दिवसांपूर्वीच आढावा घेण्यात आला होता. आमदार व शिवसेना नेते भास्कर जाधव यांनी विदर्भात जाऊन विविध मतदारसंघांची पाहणी केली. त्यानंतर, विदर्भात शिवसेना पक्ष सर्वात मोठा होऊ शकतो, येथे शिवसेनेला खूप वाव असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. त्यानंतर, आज गोंदियाचे (gondia) माजी आमदार आणि भाजपचे नेते  रमेश कुथे यांनी शिवसेना ठाकरे गटात पक्षप्रवेश केला. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (uddhav Thackeray) यांच्या उपस्थितीत मातोश्रीवर हा पक्षप्रवेश पार पडला. यावेळी त्यांच्यासोबत असलेल्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी सुद्धा ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. या पक्षप्रवेशानंतर, भाजपने (BJP) मला 2018 पासून बेवकूफ बनवलं  अशी प्रतिक्रिया रमेश कुथे यांनी माध्यमांना दिली. तर, मी पक्षातच होतो,फक्त शिकण्यासाठी तिकडे गेलो होतो, असेही त्यांनी म्हटले. 


शिवबंधन बांधताच माजी आमदार रमेश कुथे यांनी भाजपवर निशाणा साधला. भाजपने मला बेवकूफ बनवलं, फेब्रुवारी 2024 मध्ये बावनकुळे नागपूरला आले आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की, आपल्याकडे येणाऱ्यांची खूप मोठी लाईन आहे. 100 जण आपल्याकडे येतील आणि 5 जण जातील, त्याने आपल्याला फरक पडत नाही, त्याच दिवशी कळलं की भाजपने आपल्याला बेवकूफ बनवलं, अशा शब्दात रमेश कुथे यांनी भाजप व चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर शिवसेना प्रवेशानंतर टीका केली आहे.  


गोंदियातून मला तिकीट मिळणार


मी आधी शिवसेनेत होतो आणि पुन्हा एकदा  शिवसेनेत आलो आहे. 2019 ला मी विधानसभेचे तिकीट भाजपला मागितलं होतं, पण मला तिकीट दिलं नाही.  त्यानंतर मी जिल्हा परिषद  सभापतीसाठी माझ्या मुलाचं नाव समोर केलं, तेव्हा सुद्धा त्यांनी नाकारलं. माझा मुलगा अपक्ष म्हणून उभा राहिला आणि सभापती झाला. आता सुद्धा मला ते तिकीट देणार नव्हते, त्यामुळे इथे राहून उपयोग नव्हता. विधानसभेचे तिकीट आम्ही मागितलं आहे, आणि ते 100% मला मिळणार, असा विश्वासही कुथे यांनी व्यक्त केला. तर,  माझा मुलगा सध्यातरी अपक्षच राहणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. 


माजी आमदार संतोष सांबरे यांचाही पक्षप्रवेश


दरम्यान, बदनापूर मतदारसंघातील नेते आणि माजी आमदार संतोष सांबरे यांच्या नेतृत्वाखाली बदनापूर विधानसभा मतदारसंघातील भाजपासह विविध पक्षातील नेते व पदाधिकारी यांच्यासह कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत मातोश्रीवर आज सर्वांचा पक्षप्रवेश झाला आहे.  


कोण आहेत रमेश कुथे


शिवसेनेकडून दोन वेळा आमदार राहिलेले रमेश कुथे यांनी अखेर शिवसेना पक्षात घरवापसी केली आहे. 2019 मध्ये रमेश कुथे यांनी शिवसेना सोडत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता. आता सहा वर्षानंतर भाजपला सोडचिठ्ठी देत गोंदियाचे माजी आमदार रमेश कुथे यांनी आज मुंबईत शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करुन घरवापसी केली आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ‘मातोश्री’वर त्यांचा पक्षप्रवेश झाला. रमेश कुथे हे 1995 आणि 1999 असे दोन वेळा शिवसेनेच्या तिकिटावर  विधानसभा निवडणूक जिंकले होते. त्यानंतर, मात्र 2004 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा काँग्रेस पक्षाचे गोपालदास अग्रवाल यांच्याकडून पराभव झाला होता. 2019 मध्ये रमेश कुथे यांनी शिवसेनेला 'जय महाराष्ट्र' करत भाजपमध्ये प्रवेश केला होता. पण, गेल्या काही दिवसांपासून ते राज्यातील भाजप नेत्यांवर नाराज होते. मध्यंतरी त्यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची देखील भेट घेतली होती. मात्र, आज मुंबईत पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत त्यांचा शिवसेना पक्षप्रवेश झाला. 


विदर्भात शिवसेना ठाकरे गट सक्रीय


दरम्यान, आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते भास्कर जाधव यांनी विदर्भाचा दौरा केला होता. त्यावेळी, विदर्भात शिवसेना सर्वात मोठा पक्ष बनेल, असे भाकीतही त्यांनी केलं होतं. त्यामुळे, विदर्भात शिवसेना ठाकरे गटाकडून आपली ताकद वाढविण्यासाठी प्रयत्न होत असल्याचे दिसून येत आहे. त्यातच, आजच्या माजी आमदार रमेश कुथे यांच्या पक्षप्रवेशाने शिवसेनेची ताकद विदर्भात वाढली आहे. 


हेही वाचा


भाजपला दे धक्का, माजी आमदाराने बांधले शिवबंधन; उद्धव ठाकरे म्हणाले, पुन्हा पक्ष सोडायचा प्रयत्न केला तर?