Minister Hasan Mushrif : राज्यात विधानसभा निवडणुकीत (Vidhansabha Election) बहुरंगी लढती होणार असून, महायुतीला 165 जागा मिळतील असा दावा, राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ (Minister Hasan Mushrif) यांनी केला आहे. या विधानसभेला राष्ट्रवादीचे दोन पक्ष , शिवसेनेचे दोन पक्ष, भाजप, काँग्रेस, मनसे, वंचित बहुजण आघाडी आणि अपक्ष असे अनेक पक्ष आहेत. यामध्ये कोणीही थांबायला तयार नसल्यानं बहुरंगी लढती होतील असा दावा मुश्रीफ यांनी केला. राज्यात अजित पवार (Ajit Pawar) यांची राष्ट्रवादी तिसरी आघाडी वगैरे काही करणार नाही. आम्ही महायुतीमध्येच लढणार असल्याचा निर्वाळा देखील मुश्रीफ यांनी दिला. आज ते पंढरपुरात श्री विठ्ठल दर्शनासाठी आले होते. त्यावेळी बोलत होते.
अजित पवार गटाला विधानसभेत मोठे यश मिळणार
राज्यात होणाऱ्या बहुरंगी लढतीत काय करायचे हे जनतेने ठरविले आहे. यंदा राष्ट्रवादी आणि महायुतीला विजयी करण्याचे जनतेने ठरवल्याचे मुश्रीफ यांनी सांगितले. निवडणुकीनंतर कळेल अजित पवार यांच्या राष्ट्रवादी गटाने कसे काम केले आहे असेही ते म्हणाले. अजित पवार गटाला विधानसभेत मोठे यश मिळणार असल्याचे मुश्रीफ यांनी सांगितले. आधी महायुतीची सत्ता आणणे महत्वाचे असून त्यानंतर मुख्यमंत्री कोण हे ठरेल असेही मुश्रीफ यांनी सांगितले. लोकसभेत ज्या चुका झाल्या त्या दुरुस्त करून आता लोकात जात असल्याचे त्यांनी सांगितले. या विधानसभेला महायुतीच्या 165 जागा जिंकणार असल्याचा दावाही त्यांनी केला.
कोल्हापूर येथील पूरस्थिती गंभीर
कोल्हापूर येथील पूरस्थिती गंभीर असून, काल मुंबई येथून आपण बैठक घेतली होती. आता तुळजापूरचे दर्शन घेऊन थेट कोल्हापूरकडे जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. कोल्हापूर परिसरात अजून पाऊस थांबला नसल्यानं पूरस्थिती गंभीर बनल्याने आता कोल्हापूर येथे थांबून मदतकार्य करणार असल्याचे मुश्रीफ यांनी सांगितले.
मनोज जरांगेंच्या आंदोलनासंदर्भात काय म्हणाले मुश्रीफ
शरद पवार, उद्धव ठाकरे आणि नाना पटोले यांनी मराठा आरक्षणासंदर्भात भूमिका स्पष्ट करावी ही मनोज जरंगे यांची मागणी रास्त असून शासनाने बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीला हे विरोधी पक्ष आले नसल्याचे मुश्रीफ यांनी सांगितले. मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण द्यायला पाहिजे की, नको या त्यांच्या भूमिकेचा खुलासा विरोधी पक्षाने केला पाहिजे असेही यावेळी त्यांनी सांगितले. मनोज जरंगे यांच्याकडून भाजपवर होत असणाऱ्या टीकेचा समाचार घेताना ते अशा पद्धतीने का वक्तव्य करत आहेत याचे कोडे उलघडत नसून जर त्यांना आरक्षण पाहिजे तर अशा वक्तव्यामागचा उद्देशच मला समजत नसल्याचे मुश्रीफ यांनी सांगितले.
आणखीन बऱ्याच गोष्टी आहेत त्या कधीतरी बोलेन
अनिल देशमुख यांच्याही टीकेचा समाचार घेताना या शिळ्या कढीला ऊत आणण्याचा प्रकार आहे. हे खरे होते तर त्यांनी त्याच वेळी तक्रार किंवा एफआयआर करायला पाहिजे होता असा टोला मुश्रीफांनी लगावला. आता बोलून लोकांना खरे कसे वाटणार? असा सवाल करत लोक यावर विश्वास ठेवत नसून, आणखीन बऱ्याच गोष्टी आहेत त्या कधीतरी बोलेन असा टोलाही मुश्रीफ यांनी लगावला.
महत्वाच्या बातम्या: