Ramdas Athawale : भाजपा (BJP) आणि एकूणच एनडीएने (NDA) "अब की बार 400 पार" ही घोषणा दिली आहे, त्यामध्ये आमच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (RPI) सुद्धा मोठे योगदान आहे. जर महायुतीने आमच्या भारतीय रिपब्लिकन पक्षाला (RPI) एकही जागा दिली नाही, तर आम्हाला तोंड दाखवायला जागा उरणार नाही, असं केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी म्हटंलय
"महायुतीने मला शिर्डी लोकसभा निवडणुक लढवू द्यावी"
रामदास आठवलेंनी पत्रकारांशी बोलताना आपली इच्छा बोलून दाखवली आहे, ते म्हणाले की, महायुतीने मला शिर्डी लोकसभा निवडणुक लढवू द्यावी. मी स्वतः शिर्डी लोकसभा मधून दोन वेळा खासदार झालो आहे. तिसऱ्यांदा मला हार पत्करावी लागली, पण मला परत आता शिर्डी लोकसभा निवडणुक लढवायची आहे.
"भाजपा आणि मित्रपक्षांची जी महायुती झाली, ती फक्त अजित पवार गटामुळे नाही.."
रामदास आठवले म्हणाले, भाजपा आणि मित्रपक्षांची जी काही महायुती झाली, ती काही फक्त अजित पवार गट सामील झाला म्हणून नव्हे, तर आम्ही सुद्धा भाजप मध्ये आहोत म्हणून झाली. भाजपाच्या मित्र पक्षाला सुद्धा आंबेडकरवादी मतं पूर्वी मिळत नव्हती, पण आम्ही जेव्हा भाजपाच्या सोबत युती केली तेव्हा 2012 पासून SC मतं भाजपाला मिळू लागली. अशोक चव्हाण आता भाजपा सोबत आले आहे. तिथे कमलनाथ आणि त्यांचा मुलगा सुद्धा भाजपमध्ये येणार आहेत..
"कांग्रेसने चंद्रकांत हांडोरेंना राज्यसभा देऊन खूप योग्य केलं"
आठवले पुढे म्हणाले, कांग्रेसने चंद्रकांत हांडोरे यांना राज्यसभा दिली हे खूप योग्य केलं आहे. चंद्रकांत हांडोरे पूर्वी आमच्या पक्षात होते. आंबेडकर चळवळीतील कार्यकर्त्याला राज्यसभेवर जाण्याची संधी दिली हे योग्य केलं आहे. चंद्रकांत हांडोरे यांनी समाजासाठी त्यांच्या कामकाजातून योगदान दिले आहे. काँग्रेसने चंद्रकांत हांडोरे यांना राज्यसभेची उमेदवारी दिली आणि मल्लिकार्जून खरगे यांना पक्षाध्यक्ष बनवलं. हे ठीक आहे पण जेव्हा कर्नाटक मध्ये काँग्रेस जिंकल्यानंतर मुख्यमंत्री म्हणून मल्लिकार्जून खरगे यांचा विचार देखील केला नव्हता.
पंतप्रधान मोदी लक्षद्विप दौऱ्याबाबत..
काही दिवसांपूर्वी पंतप्रधान मोदी हे स्वतः लक्षद्वीपला गेले होते लक्षद्वीप खूप सुंदर आहे. यापूर्वी भारतीय लोकं ही मालदीवला फिरायला जात होती, पण आता लक्षद्वीप हे भारतीय लोकांचे आवडते ठिकाण झाले आहे. त्यामुळे मी सुद्धा चार दिवसांसाठी माझ्या कुटुंबासोबत लक्षद्वीपला भेट द्यायला जात आहे. असं आठवले म्हणाले.
"शरद पवारांना निवडणूक आयोगाचा निर्णय मान्य नसेल तर.."
शरद पवार यांच्याबाबत बोलताना रामदास आठवले म्हणतात, शरद पवार हे खूप मोठे नेते आहेत त्यांनीच मला मंत्रिपदाची पहिली संधी दिली होती. शरद पवार हे एक अभ्यासू नेते आहेत.. पण जर त्यांना निवडणूक आयोगाचा निर्णय मान्य नसेल तर त्यांनी कोर्टात जावं. बारामती हा पूर्वी शरद पवार आणि राष्ट्रवादीचा बालेकिल्ला होता पण आता तो महायुतीचा गड आहे.. कारण 2014 लोकसभा निवडणुकीत महादेव जानकर बारामती मधून लोकसभेसाठी उभे होते, तेव्हा महादेव जानकर खूप थोड्या मतांनी हरले होते. आता मात्र बारामती लोकसभा सोपी नसणार. सुनेत्रा पवार तिथून लोकसभेसाठी उभ्या राहणार आहेत.
हेही वाचा>>>