सोलापूर : जसा पराभव पचवता आला पाहिजे तसा विजयसुद्धा पचवता आला पाहिजे, आम्ही पराभव पचवतोय, त्यांना विजय पचवता येत नाही, अहंकारातून वाचाळ बडबड सुरू आहे अशा शब्दात आमदार राम सातपुते (Ram Satpute) यांनी सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांच्यावर टीका केली. जिंकल्यावर माजू नये आणि हारल्यावर लाजू नये असं म्हणत प्रणिती शिंदेंच्या विजयापेक्षा माझ्या पराभवाची चर्चा जास्त आहे असं राम सातपुतेंनी शायराना अंदाज व्यक्त केला.
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या प्रणिती शिंदे यांनी भाजपच्या राम सातपुतेंचा मोठ्या मताधिक्याने पराभव केला होता. त्यानंतर राम सातपुते हे सोलापुरात भाजपच्या कार्यकर्त्यांचे आभार मानण्यासाठी आले होते. त्यावेळी राम सातपुतेंनी हिंदी शायरीतून प्रणिती शिंदे यांच्यावर टीका केली. ते म्हणाले की, "हरल्यावर लाजू नये आणि जिंकल्यावर माजू नये हा वाक्यप्रचार आहे. तो मी स्वतः साठी लागू केला, तो माझ्यासाठी होता आणि समजनेवालों को इशारा काफी है. इतना भी गुमान ना के अपने जित पर, तेरे जीत से ज्यादा चर्चे मेरे हार के है."
फक्त स्टंटबाजी करणे प्रणिती शिंदेंची सवय
राजकीय संस्कृती नसलेला खासदार सोलापूरकर पाहतायत असं म्हणत आमदार राम सातपुते यांनी खासदार प्रणिती शिंदे यांच्यावर टीका केली. ते म्हणाले की, चंद्रकांतदादांबद्दल ज्या पद्धतीने अपमानजनक खासदारांनी बोललं, त्याचा मी निषेध करतो. दादांच्या वयाचा विचार त्यांनी करायला पाहिजे होता. ज्या पद्धतीने ते भाषा वापरत आहेत, ज्या पद्धतीने स्टंटबाजी करत आहेत, ज्या पद्धतीने त्या वागता आहेत इथला कार्यकर्ता पाहतोय, सोलापूरकर पाहतायत. सोलापूरचे प्रश्न, इथला विकास याबद्दल खासदार कधी काय करतील का नाही याच्याबद्दल शंका आहे, कारण फक्त स्टंटबाजी करणे हा त्यांचा खऱ्या अर्थाने स्वभाव आहे.
भिंती रंगवून, वडापाव खाऊन पुढे आलोय, एका पराभवाने खचणार नाही
राम सातपुते म्हणाले की, सोलापुरातील 5 लाख 46 हजार 028 लोकांनी मला खासदार म्हटलंय, आपण पराभव झालं तरी तुमच्या प्रत्येक हाकेवर मी अर्ध्या रात्री उभा राहीन. मी भिंती रंगवून, वडापाव खाऊन पुढे आलोय, एका पराभवाने मी खचणारा कार्यकर्ता नाही.
भाजप कार्यकर्ता पराभवातून शिकतो
आमदार राम सातपुते म्हणाले की, सकाळी 7 ते रात्री 12 पर्यंत राबणारा कार्यकर्ता मी पाहिला आहे. मोदीजी तिसऱ्यांदा प्रधानमंत्री झाले हे आमचे भाग्य आहे. भाजप ही राष्ट्रभक्तांची पार्टी आहे. भाजप कार्यकर्ता निवडणूक हरत नाही, तो एकतर जिंकतो किंवा परभवातून शिकतो. भर उन्हात पॉम्पलेट वाटणारा कार्यकर्ता हा माझ्या कामाची प्रेरणा. दोन खासदारवरून 302 वर घेऊन जाण्याचे काम भाजपच्या कार्यकर्त्यांनी केलंय. ज्यांना कुठलीही निवडणुका लढाव्याची नाही तरी केवळ भगव्या झेंड्यासाठी कामं करणारे कार्यकर्ते मी पाहिली आहेत.
आपण ही निवडणूक हरलेलो नाही तर या निवडणुकीतून अनेक गोष्टी शिकलोय असं सांगत राम सातपुते म्हणाले की, सोलापूर मध्य विधानसभा फिरताना पाहिलं की अनेकांची नावे मतदार यादीतून डिलीट करण्यात आली. निवडून आलेल्या उमेदवाराचे अभिनंदन आम्ही करतो. पण असं म्हणतात की, निवडणूक जिंकल्यावर माजू नये आणि हरल्यावर लाजू नये. सोलापुरातील हिंदुत्ववादी जनता ही भाजपच्या बाजूने पूर्णपने उभी राहिली आहे.
गाव खेड्यातील लोकांना भाजपने काय कामं केलं हे सांगायला आपण कमी पडलो. पराभव झाला तर पाच वर्षे वाट पाहावी लागते. पण आपल्याला संधी आहे लोकसभेतला वचपा विधानसभेत काढा. ज्यांनी मतदान केलं, ज्यांनी मतदान केलं नाही त्या सर्वाना सोबत आपल्याला घ्यायचं आहे. बोगस मतदानावर आता लक्ष द्यायची गरज आहे असं राम सातपुते म्हणाले.
संजय राऊत म्हणतात की मुख्यमंत्रीपदाचा चेहरा घोषित करावा लागेल. शरद पवार म्हणतात सामूहिक नेतृत्व पाहिजे, काँग्रेस कुठं चर्चेतच नाही. त्यामुले महाराष्ट्राच्या विधानसभेत येणाऱ्या निवडणुकीत भाजपचा भगवा फडकेल यात शंका नाही असा विश्वास राम सातपुतेंनी व्यक्त केला.
ही बातमी वाचा: