Rohini Khadse : केंद्रीय मंत्री रक्षा खडसे (Raksha Khadse) यांच्या मुलीसह काही मुलींची मुक्ताईनगर (Muktainagar) तालुक्यातील कोथळी गावातील संत मुक्ताई यात्रेमध्ये टवाळखोरांनी छेडछाड केल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला. या प्रकरणात एकूण पाच जणांवर पोक्सो अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. तर अनिकेत भोई या आरोपीला ताब्यात घेतले आहे. या प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आरोपी हे एका विशिष्ट पक्षाचे कार्यकर्ते असल्याचे म्हटले आहे. आता रक्षा खडसे यांच्या मुलीची ज्या मुलांनी छेड काढली ती मुले शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत पाटील यांचे कार्यकर्ते असल्याची माहिती समोर आली आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे (Rohini Khadse) यांनी याबाबत मोठा दावा केला आहे. एफआयआरमधे नाव असलेले अनिकेत भोई, पियूष मोरे यांचे आमदार चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या सोबतचे फोटो सोशल मिडियावर व्हायरल झाले आहेत. 


रोहिणी खडसे एबीपी माझाशी बोलताना म्हणाल्या की,  देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या वक्तव्यात असे म्हटले आहे की, आरोपी एका विशिष्ट पक्षाचे आहेत. त्यानंतर हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. आरोपींचे एकनाथ शिंदे यांच्या सोबत फोटो आहेत. मला देवेंद्र फडणवीस यांचे आभार व्यक्त करायचे आहेत की, आरोपी सत्ताधारी पक्षाचे जरी कार्यकर्ते असले तरी त्यांनी कारवाईचे आदेश दिले आहेत. पण कारवाईचे आदेश देण्यापेक्षा लवकरात लवकर त्या मुलींना न्याय देण्यासाठी आणि भविष्यात अशा घटना घडवू नये, यासाठी देखील देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील पोलीस अधिकाऱ्यांना सूचना करणे अपेक्षित आहे. 


कारवाईचे आदेश दिले हे स्वागतार्ह, पण...


सत्ताधारी पक्षाच्या आमदारांचे कार्यकर्त्यांची जर अशा छेडखानीच्या प्रकरणात नावे येत असतील. तर देवेंद्र फडणवीस यांनी कारवाई करण्याचे आदेश दिले हे स्वागतार्ह आहे. पण कडक कारवाई करणे अपेक्षित आहे. कदाचित सत्ताधारी पक्षाचे कार्यकर्ते आहेत, असे त्यांना उघडपणे मान्य करायचे नसेल. पण त्यांनी इतकं तरी मान्य केले की ते विशिष्ट पक्षाचे कार्यकर्ते आहेत. आणि त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे, यासाठी देवेंद्र फडणवीस यांचे कौतुकच करायला हवे, असेही रोहिणी खडसे यांनी म्हटले आहे. 



आणखी वाचा 


Navneet Rana : राजकीय व्यक्ती असेल तर भरचौकात आणून फाशी द्यावी; खडसेंच्या लेकीच्या छेडछाडीवरून नवनीत राणा भडकल्या