Ramdas Athawale on Dhananjay Munde : बीड येथील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात (Santosh Deshmukh Murder Case) पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्रात वाल्मिक कराड (Walmik Karad) हाच मुख्य सूत्रधार असल्याचे नमूद करण्यात आले आहे. वाल्मिक कराड हा संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा सूत्रधार असल्याने मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी दबाव वाढत चालला आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी सोमवारपर्यंत धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या नाहीतर आम्ही पेटून उठू, असा जाहीर इशाराच दिलाय, तर करुणा शर्मा (Karuna Sharma) यांनी फेसबुकवर पोस्ट करत 3 मार्च 2025 रोजी राजीनामा होणार असल्याचा दावा केलाय. आता केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबाबत मोठं वक्तव्य केलंय.  

नाशिक येथे पत्रकारांशी संवाद साधताना रामदास आठवले म्हणाले की, करुणा मुंडे आणि धनंजय मुंडे यांचे काय संबंध आहेत हे सगळ्यांना माहिती आहे. करुणा मुंडे यांना माहिती मिळाली असेल तर मला त्याबद्दल माहिती नाही. एक गोष्ट खरी आहे की, वाल्मिक कराडच्या सांगण्यावरून संतोष देशमुखचा मर्डर केल्याची सगळी माहिती सीआयडीला मिळाली. 

धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यायला पाहिजे

मला असं वाटतं की धनंजय मुंडे आणि वाल्मीक कराड यांचा मोठ्या प्रमाणात जवळचा संबंध होता. पण, या कोणाशी काही संबंध नसेल असे काय पुरावेही  नाही. परंतु धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा ही मागणी आहे. अजितदादांनी याबाबत विचार करणे आवश्यक आहे. खुनाच्या प्रकरणामध्ये धनंजय मुंडे यांचा कसलाही संबंध नाही. पण, खुनातील आरोपी जवळचा होता. नीतिमत्तेच्या आधारावर धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यायला पाहिजे. त्याचा निर्णय अजितदादा पवार यांनी घेतला पाहिजे, असे त्यांनी म्हटले. संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि सोमनाथ सूर्यवंशी या प्रकरणावर धनंजय मुंडे यांची भूमिका दुटप्पी असल्याचे देखील रामदास आठवले यांनी म्हटले.  

रक्षा खडसे यांच्या मुलीची छेड काढणे ही बाब गंभीर

केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीची टवाळखोरांनी छेडछाड केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत विचारले असता रामदास आठवले म्हणाले की, रक्षा खडसे यांच्या मुलीची छेड काढण्याचा प्रयत्न केला असेल ही बाब गंभीर आहे. पुण्यातील घटना देखील गंभीर आहे, आरोपीला पकडले आहे. यासाठी समाज बांधवांनी गावागावांनी एकत्र आले पाहिजे. या प्रवृत्ती ठेचून काढायला सर्वांनी एकत्र काम केलं पाहिजे. रक्षा खडसे यांच्या मुलीची छेड काढणे ही अत्यंत अयोग्य बाब आहे. तक्रार दिल्यानंतर आरोपी पकडले जातील. विरोधकांचे म्हणणे खरे असले तरी याच्यात राजकारण करण्याची गरज नाही. पोलिसांनी ऍक्टिव्ह राहणे महत्त्वाचे आहे. कायदे असले तरी सुद्धा समाजामध्ये कायदे मोडणारे असंख्य लोक आहेत, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.   

आणखी वाचा 

Raksha Khadse : केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंच्या मुलीची टवाळखोरांकडून छेडछाड, संत मुक्ताई यात्रेतील धक्कादायक प्रकार