Rajan Salvi, Rajapur : उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे (Shivsena Uddhav Thackeray) माजी आमदार राजन साळवी (Rajan Salvi) हे पक्ष बदलणार असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु होत्या. त्यानंतर भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी ते चांगले कार्यकर्ते आहेत, असं म्हटल्यामुळे राजन साळवी भाजपमध्ये प्रवेश करतील असं बोललं जात होतं. मात्र, काल राजन साळवी यांनी प्रवीण दरेकर यांच्याबाबतही प्रतिक्रिया दिली होती. "मी निष्ठावंत शिवसैनिक आहे. पिकलेल्या आंब्यावर कोणीतरी दगड मारतात, तशा प्रकारचा प्रयत्न भाजप आणि अन्य कोणाचा असेल. पक्षात येणाऱ्या प्रत्येकाचं स्वागत करणं हे प्रत्येक पक्षाच्या प्रमुखाचे कर्तव्य असते. त्यामुळे त्यांनी भावना व्यक्त केल्या असतील. मी मतदार संघात काम करत आहे", असं राजन साळवी (Rajan Salvi) म्हणाले होते. त्यामुळे पक्ष बदलाच्या चर्चेला पुर्णविराम मिळाला होता. मात्र, आज पुन्हा एकदा राजन साळवींनी (Rajan Salvi) पक्ष बदलाचे संकेत दिले आहेत.
राजन साळवी आज काय काय म्हणाले?
राजन साळवी म्हणाले, मागच्या काही दिवसांपासून माझ्या बाबतीत पक्ष प्रवेशाच्या बातम्या येत आहेत. माझ्या कार्यकर्त्यांनी देखील याबाबत मला विचारणा केली. त्यावेळी त्यांना मी योग्य वेळी योग्य निर्णय घेईल असं सांगितलं आहे. लांजा असेल किंवा राजापूर या ठिकाणच्या पराभवाचा मंथन करत असताना भविष्याची दिशा काय याबाबत प्रश्न विचारले. त्यावेळी त्यांना योग्य वेळी योग्य निर्णय घेणार असल्याचं मी सांगितल्याचं साळवी यांनी म्हटलं आहे.
साळवी यांच्या पराभवाला कारणीभूत ठरलेला वरिष्ठ नेता कोण?
दरम्यान माझ्या पराभवाला वरिष्ठ कारणीभूत आहेत, असं साळवी यांनी म्हटलंय. त्यामुळे आता साळवी यांनी पक्ष बदलाचे संकेत दिल्याचं स्पष्ट झाला आहे. आज माझ्यावर अशी वेळ आली अशी इतर कार्यकर्त्यांवर देखील येईल असं सांगायलाही साळवी विसलेलेल नाहीत. त्यामुळे साळवी यांच्या पराभवाला कारणीभूत ठरलेला वरिष्ठ नेता कोण? राजन साळवी यांचा नेमका रोख कुणाकडे? याबाबत आता प्रश्न निर्माण झाले आहेत.
राजन साळवींची राजकीय कारकिर्द
राजन साळवी यांनी त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात भारतीय विद्यार्थी सेनेपासून केली होती. त्यानंतर ते रत्नागिरी नगरपरिषदेचे नगराध्यक्ष देखील झाले होते. 2004 साली बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते त्यांचा शिवतिर्थावर ढाल देऊन सन्मान करण्यात आला होता. 2006 मध्ये त्यांनी पोटनिवडणूक लढवली होती, मात्र, त्यांना निसटत्या पराभवाला सामोरे जावे लागले होते. त्यानंतर 2009, 2014 आणि 2019 मध्ये ते विधानसभा निवडणूक लढले आणि जिंकले सुद्धा...मात्र, यंदाच्या म्हणजे 2024 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झालाय.
इतर महत्त्वाच्या बातम्या