बीड: मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणाचे सूत्रधार असल्याचा ठपका असणारे वाल्मिक कराड यांच्या बीड पोलीस ठाण्यातील मुक्काम सध्या प्रचंड चर्चेचा विषय ठरत आहे. आधी पोलीस ठाण्यात अचानक आणलेले पलंग वादास कारणीभूत ठरले होते. यानंतर संतोष देशमुख यांचा भाऊ धनंजय देशमुख यांनी बीड शहर पोलीस ठाण्यात काही व्यक्ती वाल्मिक कराडच्या कोठडीपर्यंत जात असल्याचा आरोप केला होता. याबद्दल जाब विचारताच पोलिसांनी मला दमदाटी केली, असेही धनंजय देशमुख यांनी म्हटले होते. त्यांनी बीडच्या जिल्हा पोलीस अधीक्षकांना तसे एक पत्रही दिले होते. या पार्श्वभूमीवर वाल्मिक कराड यांचे सहकारी आणि कारेगावचे सरपंच बालाजी तांदळे यांनी आपली बाजू स्पष्ट केली आहे.
बालाजी तांदळे यांनी धनंजय देशमुख यांनी केलेले सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. त्यांनी म्हटले की, धनंजय देशमुखचा आरोप चुकीचा आहे. मला सीआयीने तपासाला सोबत नेले होते. सकाळी 9 वाजता मला डीवायएसपी गुजर सरांचा फोन आला. मी आंघोळ करुन घरातून बाहेर पडलो आणि त्यांच्यासोबत गेलो. त्यांनी प्रथम मला केजला येण्यास सांगितले, नंतर ते मला बीडला घेऊन गेले. बीड शहर पोलीस ठाण्यात माझी चौकशी करण्यात आली. मी बाथरुमसाठी बाहेर पडलो तेव्हा तिथे मला धनंजय देशमुख दिसला. तो मला म्हणाला की, तुम्ही खुश दिसताय, नर्व्हस दिसत नाही. मी याठिकाणी चौकशीसाठी आल्याचे त्याला सांगितले. आम्ही बोलत होतो तेव्हा तिथे इतर कोणताही पोलीस कर्मचारी नव्हता. त्यामुळे धनंजय देशमुख यांनी पोलिसांनी दमदाटी केल्याचा आरोप खोटा आहे, असे बालाजी तांदळे यांनी सांगितले. मी पोलीस ठाण्यात असताना वाल्मिक कराड यांनाही भेटलो नाही, असेही तांदळे यांनी 'एबीपी माझा'शी बोलताना स्पष्ट केले.
जितेंद्र आव्हाडांचे बालाजी तांदळेंवर गंभीर आरोप
शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी शुक्रवारी एक ट्विट केले होते. यामध्ये त्यांनी बालाजी तांदळे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. या ट्विटमध्ये आव्हाड यांनी म्हटले होते की, अजितदादा पवार हे काहीच खपवून घेत नाहीत, अशी त्यांची प्रतिमा आहे. मग, त्यांना या गोष्टी कशा काय खपतात? आज जे काही मला कळले ते आणखी धक्कादायक होते. पूर्ण पोलीस बंदोबस्तात एक गाडी आत गेली. त्या गाडीतून उतरलेला एक इसम पोलीस ठाण्यात गेला आणि महिला कर्मचाऱ्यांशीच भांडू लागला. त्या इसमाचे नाव बालाजी तांदळे! तो एका गावाचा सरपंच आहे. मात्र, याहीपेक्षा अधिक धक्कादायक बाब म्हणजे, दोन पत्रकारांनी मला असे सांगितले की, "आम्ही परळीसह बीडमधून बाहेर पडतोय. आम्ही उद्या मुंबई, पुण्याला निघून जाऊ , कारण आमच्या मागे काही इसम सातत्याने आमच्या मागे लागले आहेत, असे जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटमध्ये म्हटले होते.
आणखी वाचा
वाल्मिक कराड अखेर गोत्यात आलाच, देशमुखांच्या मारेकऱ्याची पोलिसांसमोर महत्त्वाची कबुली, म्हणाला...