मुंबई: महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार पार पडल्यानंतर आता सर्वांना पालकमंत्रीपदांची उत्सुकता लागली आहे. मात्र, या सगळ्यात कधी नव्हे ते बीड जिल्ह्याचे पालकमंत्रीपद कोणाला मिळणार, याची जास्त चर्चा रंगली आहे. बीडमधील संतोष देशमुख हत्याप्रकरणामुळे वाल्मिक कराड यांना अटक करण्यात आली आहे. त्यामुळे धनंजय मुंडे यांच्या मंत्रि‍पदावर टांगती तलवार असताना त्यांनाच पुन्हा बीड जिल्ह्याचे पालकमंत्रीपद मिळण्याची शक्यता फारच कमी आहे. त्यामुळे आता बीड जिल्ह्याचे पालकमंत्रीपद कोणाला मिळणार, याविषयी तर्कवितर्क लढवले जात आहेत.


या पार्श्वभूमीवर आता अजित पवार यांच्याकडून महत्त्वाचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, उपमुख्यमंत्री अजित पवार दोन जिल्ह्यांचे पालकमंत्रीपद घेण्याची शक्यता आहे. अजित पवार पुण्यासह आणखी एका जिल्ह्याच पालकमंत्री पद घेऊ शकतात. दुसरा जिल्हा बीड असू शकतो, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. त्यामुळे महायुतीत पुणे आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्रीपद राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे येऊ शकते. अजित पवार मुंबईत दाखल झाल्यानंतर पालकमंत्री पदाबाबत अंतिम निर्णय होईल आणि त्यानंतर पक्षाची पालकमंत्री पदाची यादी महायुतीच्या समन्वयकांना दिली जाईल, असे समजते. 


आतापर्यंत बीड जिल्हा म्हटले की, मुंडे घराणे असे अलिखित समीकरण होते. मात्र, आता धनंजय मुंडे हे त्यांच्या कारकीर्दीतील सर्वात मोठ्या संकटात सापडले आहेत. त्यामुळे धनंजय मुंडे यांच्यासाठी मंत्रीपद आणि पालकमंत्रीपद तर दूरच राहिले पण राजकीय अस्तित्व शाबूत ठेवणे, जास्त महत्त्वाचे आहे. अशा परिस्थितीत बीड जिल्ह्याचा नवा पालकमंत्री कोण असणार, याची उत्सुकता राजकीय वर्तुळाला लागली आहे.


धनंजय मुंडेंच्या मंत्रि‍पदाच्या राजीनाम्याचा निर्णय एसआयटीच्या अहवालानंतर: राधाकृष्ण विखे पाटील


बीड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाबाबत भाजपचे मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी भाष्य केले. त्यांनी म्हटले की, पालकमंत्री बाबत तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी बसून निर्णय करायचा आहे. त्याच्यावर मी भाषा करू शकणार नाही. कुणी राजीनामा मागितला म्हणून दिलाच पाहिजे असं नसतं. त्याप्रकरणी एसआयटी नेमली आहे, आय जी रँक चा तो अधिकारी आहे. एसआयटीचा अहवाल आल्यानंतर राजीनाम्याबाबत निर्णय होईल. महादेव जानकर यांना स्वतःच्या अस्तित्वासाठी लढाई करायचे आहे. त्यामुळे कोण काय भूमिका मांडता याबद्दल भाष्य करणे गरजेचे नाही, असे राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटले.



आणखी वाचा


वाल्मिक कराड अखेर गोत्यात आलाच, देशमुखांच्या मारेकऱ्याची पोलिसांसमोर महत्त्वाची कबुली, म्हणाला..