Raj Thackeray-Uddhav Thackeray मुंबई: शाळा सुरू झाल्या तरी महाराष्ट्रात पहिलीपासून हिंदीच्या मुद्द्यावरून मात्र अजूनही वादाचा गजर सुरू आहे. विरोधानंतरही त्रिभाषा सूत्रावर ठाम असलेल्या सरकारविरोधात आता ठाकरे बंधूंनी एल्गार पुकारलाय. उद्धव ठाकरे (Raj Thackeray) आणि राज ठाकरे (Uddhav Thackeray) या बंधूंनी हिंदीसक्तीविरोधात मैदानात उतरण्याची घोषणा केली आहे. जुलैच्या पहिल्या आठवड्यात ठाकरे बंधूंच्या मोर्चांनी महाराष्ट्र दणाणून निघणार आहे.
राज ठाकरे पुरस्कृत मोर्चा 5 जुलैला तर 7 तारखेला उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत मराठी समन्वय समितीचा एल्गार असणार आहे. कोणत्याही राजकीय झेंड्याशिवाय मराठीचा अजेंडा घेऊन मोर्चात सहभागी व्हा, असं आवाहन मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी केलं आहे. तसेच शिवसेना ठाकरे गटासोबत देखील आम्ही बोलू, असं राज ठाकरेंनी सांगितले. त्यामुळे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार का?, ठाकरे बंधू एकत्र येण्याची हीच ती वेळ, अशी चर्चा सध्या महाराष्ट्रभर रंगली आहे. याचदरम्यान, एक महत्वाची माहिती समोर आली आहे.
राज ठाकरेंचं ठाकरे गटाच्या नेत्यासोबत बोलणं झालं-
मुंबई तकच्या एका वृत्तानूसार, राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाच्या एका नेत्याचं या मोर्चावरुन बोलणं झालेलं आहे. राज ठाकरेंचं नेमकं कोणासोबत बोलणं झालंय, याची माहिती आज ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आजच्या पत्रकार परिषदेत देऊ शकतात. तसेच राज ठाकरे हिंदीसत्कीविरोधात 6 जुलैला हा मोर्चा काढणार होते. त्यांनी याबाबत पत्रकार परिषेदत देखील घोषणा केली होती. मात्र साधारण 2 तासानंतर राज ठाकरेंनी मोर्चाची तारीख बदलत 6 जुलै ऐवजी 5 जुलै रोजी हा विराट मोर्चा असेल, असं प्रसिद्धपत्रक जाहीर करत सांगितले.
मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेकडून हालचाली-
ठाकरे बंधूंचे दोन वेगवेगळे मोर्चे एकाच दिवशी काढण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेकडूनही यासाठी हालचाली सुरु आहेत. तसेच वेगळा मोर्चा काढण्यासाठी 5 जुलैच्या मोर्च्यात सहभागी व्हावं, यासाठी प्रयत्न केले जात आहे. तसेच राज ठाकरेंनी मोर्चाची तारीख बदलली ती ठाकरे गटाच्या म्हणण्यानूसार बदलली गेली, असं सांगितलं जात आहे. त्यामुळे ठाकरे बंधू हिंदीसक्तीविरोधात एकत्र दिसतील, असं बोलले जात आहे.
ठाकरे बंधू एकाच मोर्चात चालताना दिसणार?
हिंदीसक्तीविरोधात ठाकरे बंधूंनी एकाचवेळी दंड थोपटलेत. आता प्रश्न आहे तो म्हणजे हा हिंदीविरोधातला धागा ठाकरे बंधूंना एकत्र आणणार का? हा प्रश्न उपस्थित होण्याचं कारण म्हणजे राज ठाकरेंनी काही दिवसांपूर्वी युतीसंदर्भात केलेलं वक्तव्य...महाराष्ट्राच्या प्रश्नांपुढे बाकी काही महत्त्वाचं नसल्याचं सांगणाऱ्या ठाकरे बंधूंसाठी ती संधी आली आहे. आता हेवेदावे विसरून ठाकरे बंधू एकाच मोर्चात चालताना दिसणार का? अथवा एकमेकांच्या मोर्चात जाणार आणि त्यानिमित्तानं युतीची मशाल पेटवणार का?, हे पाहायचं आहे.