Dada Bhuse Meets Raj Thackeray मुंबई: राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांनी शिवतीर्थ या निवासस्थानी आज मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांची भेट घेतली. तृतीय भाषेच्या सक्तीवर मनसे पक्षाकडून आक्रमक भूमिका घेण्यात आलेली आहे. राजकीय पक्ष, साहित्यिक, मराठी भाषा अभ्यास केंद्र समितीकडून केलेल्या विरोधानंतर राज्य सरकारकडून बैठक बोलविण्यात आली. या बैठकीनंतर दादा भुसे यांनी राज ठाकरेंची भेट घेऊन राज्य सरकारची भूमिका समजावून सांगणार असल्याचं म्हणाले होते. त्यानंतर आज दादा भुसे राज ठाकरेंची भेट घेण्यासाठी शिवतीर्थावर दाखल झाले होते. या क्षणाला तिसऱ्या भाषेसंदर्भातला सरकारचा निर्णय राज ठाकरेंना मान्य नाही. या बैठकीत कोणताही तोडगा निघाला नाही, अशी माहिती दादा भुसे यांनी दिली. राज ठाकरेंची भेट घेतल्यानंतर दादा भुसे यांनी माध्यमांशी संवाद साधत या भेटीची माहिती दिली.
राज ठाकरेंच्या भेटीनंतर दादा भुसे काय म्हणाले?
तिसऱ्या भाषेच्या संदर्भात आज राज ठाकरेंची भेट घेतली. या क्षणाला तिसऱ्या भाषेसंदर्भातला सरकारचा निर्णय राज ठाकरेंना मान्य नाही, अशी माहिती दादा भुसे यांनी दिली. तसेच राज ठाकरेंनी चांगल्या सूचना देखील केल्या आहेत. राज ठाकरेंनी केलेल्या सूचनांवर आम्ही विचार करु, असं दादा भुसे म्हणाले. हिंदीच्या विषयावर राज ठाकरेंचा पूर्ण विरोध, असं दादा भुसे यांनी सांगितले. इतर विषयांच्या गुणांबाबत राज ठाकरेंनी काही सूचना केल्या आहेत, त्या नक्कीच स्वागतार्ह आहे, असं दादा भुसे यांनी सांगितले. या बैठकीत कोणताही तोडगा निघालेला नाही. राज ठाकरेंसोबत आज जी चर्चा झाली, ती मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांपर्यंत पोहचवणार, असंही दादा भुसे म्हणाले.
देवेंद्र फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली झालेली 23 जून रोजी बैठक-
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली त्रिभाषा सूत्रासंदर्भात 23 जून रोजी मुंबई येथील शासकीय निवासस्थानी आढावा बैठक संपन्न झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले की, त्रिभाषा सूत्रासंदर्भात साहित्यिक, भाषा तज्ज्ञ, राजकीय नेते आणि इतरही सर्व संबंधितांशी चर्चा करुनच अंतिम निर्णय घेण्यात येईल. या विषयावर सांगोपांग चर्चा झाल्यानंतर सर्व राज्यांची स्थिती सर्वांसमोर मांडावी, नवीन शैक्षणिक धोरणांतर्गत मराठी मुलांचे अकॅडेमिक बँक ऑफ क्रेडिटच्या अनुषंगाने नुकसान होऊ नये, यांसह इतरही पर्यायांवर सर्वांसाठी समग्र सादरीकरण करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.
सल्लामसलतीची प्रक्रिया पूर्ण झाल्यावरच अंतिम निर्णय-
मराठी भाषेचे अभ्यासक, साहित्यिक, राजकीय नेते यासह सर्व संबंधितांसमोर याचे सादरीकरण आणि सल्लामसलतीची प्रक्रिया राबविण्यात यावी, असे या बैठकीत ठरले. ही सल्लामसलतीची प्रक्रिया पूर्ण झाल्यावरच अंतिम निर्णय घेण्यात येईल, असेही यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. त्यामुळे शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे हे आता पुढची सल्लामसलतीची प्रक्रिया प्रारंभ करणार आहेत, अशी माहिती देवेंद्र फडणवीसांनी दिली.