Raj Thackeray On Mumbai Morcha मुंबई: पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना तिसरी भाषा शिकणे अनिवार्य करण्याचा निर्णय राज्य सरकारने रद्द केला आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी काल पत्रकार परिषद घेत हिंदीबाबतचा जीआर रद्द करण्याची घोषणा केली. दरम्यान, राज्य सरकारच्या याच निर्णयावरुन मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) 5 जुलैला मुंबईतील एकत्रित मोर्चा काढणार होते. मात्र आता हा मोर्चा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. परंतु 5 जुलैचा मोर्चा जरी रद्द करण्यात आला, तरी विजयी मेळावा घेण्यात येणार आहे. राज ठाकरेंनी आज पत्रकार परिषद घेत याबाबत माहिती दिली.
पहिलीपासून हिंदी शिकवण्याबाबतचे, म्हणजेच त्रिभाषा सूत्राचे दोन्ही जीआर रद्द केल्यानंतर, 5 जुलैला ठाकरेंची शिवसेना आणि मनसे एकत्र विजयी मोर्चा आणि जल्लोष करणार असल्याचं सांगण्यात येत होतं. उद्धव ठाकरे यांनी 5 जुलैला विजयी मोर्चा घेण्यासाठी पक्षाच्या नेत्यांबरोबरच मनसे, अन्य पक्ष आणि इतर संस्थांशी चर्चा करणार असल्याचे सांगितले होतं. त्यानंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राज ठाकरेंना फोन केला. राज्य सरकारने जीआर रद्द केला, आता पुढे काय करायचं?, असं संजय राऊत राज ठाकरेंना म्हणाले. तसेच विजयी मेळावा करुया, असंही संजय राऊतांनी सांगितले. यावर हो चालेल...5 जुलैला विजयी मेळावा घेऊ, असं राज ठाकरे म्हणाले.
राज ठाकरेंनी 5 जुलैचा सगळा प्लॅन सांगितला!
हिंदीसक्तीबाबतचा निर्णय राज्य सरकारने रद्द केल्यानंतर काल मला ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचा मला फोन आला होता. संजय राऊत म्हणाले, पुढे काय करायचं, विजयी मेळावा करुया असं म्हणाले. मी म्हणालो, मोर्चा तर रद्द करावा लागेल...त्यावर संजय राऊत म्हणाले 5 जुलैला विजयी मेळावा घेऊया, यावर हो चालेल...विजयी मेळावा घेऊया, असं राज ठाकरे संजय राऊतांना म्हणाले. चर्चा करुन विजयी मेळावा घेण्यासंदर्भात बोलू, असं राज ठाकरेंनी संजय राऊतांना कळवलं. आम्ही अद्याप ठिकाण वैगरे निश्चित केलेलं नाही. आम्ही सगळ्यांशी बोलू...माझ्या कार्यकर्त्यांशी बोलून मी सांगेन, असं राज ठाकरे म्हणाले. 5 तारखेला विजयी मेळावा होईल, त्या मेळाव्यात ही कोणत्याही पक्षाचा झेंडा नसेल, अशी माहितीही राज ठाकरेंनी दिली.