Sanjay Raut : शाळांमध्ये पहिली इयत्तेपासून तिसरी भाषा शिकणे अनिवार्य करण्याच्या निर्णयावरुन गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात मोठा वाद सुरु होता. राज्य सरकारच्या या निर्णयावरुन मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आक्रमक पवित्रा घेतला होता. या निर्णयाच्या विरोधात ठाकरे बंधूंनी 5 जुलै रोजी मुंबईत मोर्चाचे आयोजन देखील केले होते.  राज्यभरात हिंदी सक्तीवरून आणि त्रिभाषा सुत्रावरून वाद उफाळलेला असताना हिंदी सक्ती बाबतचे दोन्ही शासन निर्णय रद्द करण्यात आले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही मोठी घोषणा केली. यानंतर 5 जुलै रोजी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचा मोर्चा होणार नसून त्या ऐवजी विजयी मोर्चा किंवा जल्लोष सभा घेण्यासाठी चर्चा करू, अशी माहिती उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत दिली. आता यावर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाष्य केले आहे. 

संजय राऊत म्हणाले की, या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या काही काळातला घेतलेला शहाणपणाचा निर्णय जर कोणता असेल तर तो म्हणजे हिंदी सक्तीचा लादण्याचा निर्णय रद्द केला. महाराष्ट्राच्या मराठी माणसाच्या जनभावना त्यांनी ओळखल्या आणि बराच काळ खेळ करण्याचा प्रयत्न केला. दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. वेगवेगळे तोडगे समोर आणले. पण, शेवटी जनता काल रस्त्यावर उतरली. राज्यभरात सरकारी अध्यादेशाची होळी झाली. काल स्वतः उद्धव ठाकरे आणि इतर सर्व घटक रस्त्यावर उतरले. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्रित मोर्चाची घोषणा झाल्यावर सरकारने धसकाच घेतला होता. कारण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो मराठी लोक या मोर्चासाठी येणार होते. या सगळ्याचा परिणाम झाला आणि काल देवेंद्र फडणवीस सरकारला हा देश मागे घ्यावा लागला. 

त्रिसूत्री धोरण महाराष्ट्र स्वीकारणार नाही

आता काहीतरी एक कमिटी स्थापन केली आहे. आम्ही त्रिसूत्री भाषा सूत्र स्वीकारणारच नाही. मग, तुम्ही कमिट्या वगैरे स्थापन करून कशाकरिता करत आहात. मराठी माणसाला का खेळवत आहात? कुठल्याही परिस्थितीत राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 आणि त्यातलं हे त्रिसूत्री धोरण महाराष्ट्र स्वीकारणार नाही. हे काल उद्धव ठाकरे यांनी देखील सांगितले आहे आणि राज ठाकरे यांनी देखील सांगितले आहे. आता दोन ठाकरे बंधूंनी यावर पक्का निर्णय दिल्यावर उगाचच फडणवीस सरकारने फालतू खेळ करू नये, असे त्यांनी म्हटले आहे. 

विजयी जल्लोष होईल आणि नक्कीच तो एकत्र होईल

संजय राऊत पुढे म्हणाले की, पाच जुलैला राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे ह्हे एकत्र येणे हे महाराष्ट्रासाठी फार मोठं आकर्षण होतं. त्यामुळेच हा अध्यादेश रद्द केला आहे. पाच जुलैच्या मोर्चाची तयारी सुरू झाली. राज ठाकरेंनी त्यांच्या दोन नेत्यांची नेमणूक केली होती. आमच्याकडून सुद्धा दोन नेत्यांची नेमणूक करण्यात आली होती. त्या दृष्टीने तयारी सुरू असताना सरकारने हा निर्णय मागे घेतला. पण, पाच जुलैच्या मोर्चाची तयारी दोन्ही बाजूंनी पूर्ण झाली आहे. आता हा मराठीचा फोर्स तयार होणार होता त्याचे काय करायचे तर त्याचे रूपांतर विजय जल्लोषात करावे, अशा भूमिका दोन्ही बाजूने आहे. काल माझे राज ठाकरे साहेबांचे बोलणे झाले. आम्ही काल चर्चा केली. आता नक्की कोणत्या पद्धतीने भूमिका घ्यावी, या संदर्भात ते मत मांडतील. उद्धव ठाकरेंनी सांगितलं की, विजयी जल्लोष होईल आणि नक्कीच तो एकत्र होईल, असेही त्यांनी म्हटले.  

तुम्ही अस्वस्थ होत आहात

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चेवर देवेंद्र फडणवीस यांनी उपाहासात्मक टोला लगावला. माझ्या शुभेच्छा आहेत की, दोघांनी एकत्र राहावे, असे त्यांनी म्हटले. याबाबत संजय राऊत म्हणाले की, त्यांच्या शुभेच्छांवर मराठी माणसांची एकजूट ठरत नाही. जर देवेंद्र फडणवीस आणि प्रफुल्ल पटेल एकत्र येऊ शकतात, जर देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे एकत्र येऊ शकतात, जर देवेंद्र फडणवीस आणि हसन मुश्रीफ एकत्र येऊ शकतात, तर दोन भाऊ एकत्र येण्यात तुम्हाला कसली पोटदुखी आहे. दोन ठाकरे बंधू एकत्र येत आहेत, त्यामुळे तुम्ही अस्वस्थ होत आहात, तुम्हाला वैफल्य आलेला आहे, हे स्पष्ट दिसतंय असा पलटवार त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केला. 

आणखी वाचा

Uddhav Thackeray : ठरलं तर! 5 जुलै रोजी मोर्चा होईल किंवा सभा, पण एकत्र जल्लोष करणार हे नक्की: उद्धव ठाकरे