Mumbai News: पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला महायुती सरकारने पत्रकार परिषद घेत शाळांमध्ये पहिली इयत्तेपासून त्रिभाषा धोरण राबवण्याचा निर्णय तुर्तास रद्द करत असल्याची घोषणा केली. या पत्रकार परिषदेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उपस्थित होते. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी शाळांमधील हिंदी भाषा सक्ती आणि त्रिभाषा धोरणबाबतचे दोन्ही शासन निर्णय मागे घेत असल्याची घोषणा केली. हा विरोधक असलेल्या ठाकरे गट आणि मनसेसाठी मोठा प्रतिकात्मक विजय मानला जात आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी शाळांमधील त्रिभाषा सक्तीविरोधात 5 जुलैला मोर्चा काढण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर राज्य सरकारला हा निर्णय मागे घ्यावा लागला आहे. यामुळे ठाकरे गटाचा आत्मविश्वास वाढला असला तरी पत्रकार परिषदेतील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या एका वक्तव्यामुळे ठाकरे गटाचे कान टवकारले गेले आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी काल प्रसारमाध्यमांशी बोलताना ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांना उल्लेख केला.
देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांनी राज्य सरकारला पाठवलेल्या पत्रासंदर्भात माहिती दिली. या पत्रावर भास्कर जाधवांची सही नाही. गेल्यावेळी पत्रावर भास्कर जाधव यांची सही होती, पण यावेळी त्यांची सही दिसत नाही. विरोधकांच्या पत्रावर मी उबाठा गटाच्या पाच, काँग्रेसच्या तीन आणि शरद पवार गटाच्या दोन आमदारांच्या सह्या बघितल्या, पण त्यामध्ये भास्कर जाधव यांची सही नव्हती. आज विरोधकांच्या पत्रकार परिषदेतही भास्कर जाधव दिसले नाहीत, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले. देवेंद्र फडणवीसांनी पत्रकार परिषदेत भास्कर जाधव यांच्या इतका आवर्जून उल्लेख का केला, याची चर्चा सध्या रंगली आहे.
गेल्या काही दिवसांपासून भास्कर जाधव हे मी ठाकरे गटातच आहे, मी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत खांद्यावर जबाबदारी घेऊन काम करणार आहे, असे सांगत असले तरी त्यांचा एकूण सूर नाराजीचा आहे. एकीकडे भास्कर जाधव हे आपण उद्धव ठाकरे यांचे कसे विश्वासू आहोत, असे सांगत आहेत. मात्र, दुसऱ्या बाजूला आपल्या मंत्रिपदाच्या संधीपासून कसे वंचित ठेवण्यात आले, हे वारंवार सांगत आहेत. त्यामुळे भास्कर जाधव हे ठाकरे गटातून बाहेर पडणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. भास्कर जाधव हे रत्नागिरी जिल्ह्यातील सामर्थ्यशाली नेत्यांपैकी एक आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी कालच्या पत्रकार परिषदेत त्यांच्याबद्दल अचानक इतकी 'आत्मीयता' व्यक्त केल्याने भास्कर जाधव हे भाजपच्या संपर्कात आहेत का, असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे. आजपासून राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरु होत आहे. या अधिवेशनात भास्कर जाधव हे एखादा मोठा निर्णय घेणार का, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
आणखी वाचा
आता थांबायचा विचार करावा; भास्कर जाधवांकडून निवृत्तीचे संकेत, संजय राऊतांवरही स्पष्टच बोलले