Raj Thackeray : शस्त्रक्रियेनंतर राज ठाकरे ॲक्टिव्ह मोडमध्ये, 22 तारखेला पदाधिकारी बैठक तर 23 तारखेला पदाधिकारी मेळावा
Raj Thackeray In Active Mode : राज ठाकरे आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. ते मुंबईत 22 तारखेला प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत तर 23 तारखेला राज्यभरातील कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
Raj Thackeray In Active Mode : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) आपल्या हिप बोनच्या शस्त्रक्रियेनंतर लवकरच ॲक्टिव मोडमध्ये पाहायला मिळणार आहेत. कारण लवकरच राज ठाकरे पदाधिकारी मेळावा घेणार आहेत आणि आपल्या आगामी रणनीतीबाबत कार्यकर्त्यांशी चर्चा करणार आहेत. येत्या सोमवारी म्हणजेच 22 ऑगस्ट रोजी पदाधिकाऱ्यांसोबत बैठक होणार असून तर 23 ऑगस्टला मनसेच्या (MNS) पदाधिकाऱ्यांचा मेळावा पार पडणार आहे. आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने या बैठकांना विशेष महत्त्व आहे.
राज ठाकरे यांच्यावर 20 जून रोजी मुंबईतील लीलावती रुग्णालात हिप बोनची यशस्वी शस्त्रक्रिया पार पडली. राज ठाकरे यांची शस्त्रक्रिया पार पडल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना सक्तीची विश्रांती घेण्याचा सल्ला दिला होता. त्यानुसार मागील दोन महिने राज ठाकरे विश्रांती घेत असल्याची माहिती होती. मात्र आता पुन्हा एकदा राज ठाकरे राजकारणात ॲक्टिव मोडमध्ये आले आहेत. आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. राज ठाकरे मुंबईत 22 तारखेला प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत तर 23 तारखेला राज्यभरातील कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
राज ठाकरे 22 तारखेला प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडल्यानंतर पत्रकार परिषद देखील घेणार आहेत. या पत्रकार परिषदेत ते नेमका कुणावर आसूड ओढणार याकडे राजकीय वर्तुळाच लक्ष लागलं आहे.
भाजपसोबतची जवळीक कायम ठेवणार?
मागच्या काही दिवसांत मनसेची भाजपसोबतची जवळीकता वाढली होती. आता राज ठाकरे ॲक्टिवह मोडमध्ये आल्यानंतर ही जवळीक कायम ठेवणार की एकला चलो रेची भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं आहे. कारण दोन महिन्यांपूर्वी राज्यात जी परिस्थिती होती ती आता राहिलेली नाही. मध्यंतरीच्या काळात शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर शिवसेनासोबत नसल्यामुळे निर्माण झालेली मराठी मतांची पोकळी शिंदे सेनेमुळे आता पूर्ण होणार आहे. त्यामुळे भाजपच्या भूमिकेकडे मनसेचे देखील लक्ष असणार आहे.
शिवसेनेने साथ सोडल्यानंतर मनसे-भाजप युती होणार अशीच राज्यात चर्चा होती. याला आणखी खतपाणी मिळालं ते मनसेने भाजपला राज्यसभा, विधान परिषद आणि शिंदे-फडणवीस सरकारची बहुमत चाचणी आणि विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या वेळी केलेल्या मदतीमुळे. त्यानंतर पुढे देखील हिच चर्चा कायम असल्याची पाहायला मिळालं होतं. कारण भाजपच्या सांगण्यावरुन शिंदे गट मनसेत विलीन होणार यापासून ते नव्या सरकारमध्ये मनसेला मंत्रिपद मिळणार इथपर्यंत चर्चा सुरुच होत्या.
मुंबईतील 100 वॉर्डवर मनसेचं लक्ष
आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत 100 वॉर्ड वर मनसे लक्ष केंद्रित करणार आहे. यासोबतच ठाणे, पुणे आणि नाशिक महापालिकेवर देखील सत्तेच्या समीकरणात मनसे असेल असा विश्वास पक्षाला आहे. याचसाठी उद्धव ठाकरे यांच्या आधी राज ठाकरे दौऱ्यावर निघण्याची शक्यता आहे. त्यामुळे सत्तेच्या लढाईत नेमकं वरचढ राज ठाकरे ठरणार की उद्धव ठाकरे याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.