मुंबई : मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी महायुतीला (Mahayuti) पाठिंबा दिला आहे. आता मनसे महायुतीच्या प्रचाराला जुंपणार आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत ही मोठी घोषणा केली आहे. त्यामुळे आता लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) पार्श्वभूमीवर मनसे नेते भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीचा प्रचार करताना दिसणार आहे. राज ठाकरे यांनी मोदींना पाठिंबा जाहीर केल्यानंतर शनिवारी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक घेतली. मुंबईत पार पडलेल्या या बैठकीनंतर त्यांनी पत्रकार परिषद घेत पक्षाची भूमिका स्पष्ट केली. यावेळी त्यांनी याबाबत माध्यमांना माहिती दिली आहे.
दोन दिवसात नेत्यांची यादी जाहीर करणार
प्रचाराची जबाबदारी संबंधित नेत्यांवर देऊन त्यांची नावे जाहीर करण्यात येतील, असं ठाकरेंनी सांगितलं आहे. शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी अजित पवार गट आणि भाजप यांच्या उमेदवार आणि नेत्यांनी आमच्या कोणत्या नेत्यांनी संपर्क आणि समन्वय साधायचा, यासंदर्भातील यादी पुढच्या दोन दिवसात जाहीर करु, असं राज ठाकरे यांनी सांगितलं आहे.
मोदींना पुन्हा संधी देणं गरजेचं
राज ठाकरे पुढे म्हणाले की, राम मंदिराचा मुद्दा अनेक वर्षांपासून प्रलंबित होता. नरेंद्र मोदी नसते तर, हा मुद्दा प्रलंबित राहिला असता. आता पुन्हा एकदा त्यांना संधी देणं गरजेचे आहे, त्यामुळे त्यांना पाठिंबा दिला आहे. अनेक मुद्दे आहेत विकासाच्या दृष्टीने ते मोदी पूर्ण करतील अशी अपेक्षा आहे. तरुणांचे रोजगार, मराठी भाषेला अभिजात दर्जा असे अनेक विषय मार्गी लावतील, अशी अपेक्षा आहे.
महायुतीत प्रचार करण्यासाठी आणि समनव्यासाठी बैठक
मोदी गुजरातचे आहेत, त्यांचं गुजरात प्रेम ठिक आहे, पण सर्व राज्यांमध्ये त्यांनी त्याचप्रकारे लक्ष द्यावं. पाठिंबा दिला त्या संदर्भात पक्षातील नेत्यांशी संवाद साधला. महायुतीत प्रचार करण्यासाठी आणि समनव्य करण्यासाठी आमची बैठक झाली, अशी माहिती राज ठाकरे यांनी दिली आहे. लवकरच समन्वय साधण्यासाठी आमची यादी काही दिवसात जाहीर होईल.
राज ठाकरे शिंदे, फडणवीस, पवारांसाठी सभा घेणार?
मनसे महायुतीचा प्रचार करणार असल्याची मोठी घोषणा राज ठाकरे यांनी केली आहे. मनसे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना जबाबदारी देण्यात येईल आणि संबंधितांच्या नावांची यादी महायुतीला देण्यात येईल, असं राज ठाकरे यांनी सांगितलं आहे. दरम्यान, महायुतीच्या प्रचारासाठी स्वत: राज ठाकरे उतरणार का, असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. राज ठाकरे महायुतीसाठी सभा घेणार का, असा प्रश्नही अनेकांना पडला आहे. दरम्यान, सभा घेण्यासंदर्भात निर्णय पुढे बघू, असं राज ठाकरे म्हणाले आहेत.
राज ठाकरेंची उद्धव ठाकरेंवर टीका
उद्धव ठाकरेंवर टीका करताना राज ठाकरे म्हणाले, त्यांना कावीळ झालीय, त्यामुळे त्यांना सगळं तसं दिसतंय. दर निवडणुकीला अशी बुकिंग केली जाते. मी पक्षाचा म्हणून विचार करत असतो, त्यामुळे एक कार्यकर्ता, काय विचार करतो हे बघत नाही. विधानसभा निवडणुकीसाठी कामाला लागायला सांगितलं आहे, असं राज ठाकरे यांनी सांगितलं आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :