Maharashtra Unseasonal Rain : एकीकडे राज्यात लोकसभा निवडणुकीची (Lok Sabha Election) धामधूम पाहायला मिळत आहे, तर दुसरीकडे राज्यातील अनेक भागात अवकाळी पावसाने (Unseasonal Rain) थैमान घातल्याचे पाहायला मिळत आहे. अशात निवडणुकीचूं रिंगणात उतरलेल्या उमेदवारांनी आपल्या प्रचाराचा ताफा नुकसानग्रस्त भागाकडे वळवल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे अनेक भागात शेतकऱ्यांना (Farmer) दिलासा देण्यासाठी उमेदवारांची धावपळ पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे कधी नव्हे पाहायला मिळणारे नेतेमडंळी अचानक बांधावर येऊन धडकत असल्याने शेतकऱ्यांकडून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील नेते बांधावर...
सलग चार दिवसापासून बुलढाणा जिल्ह्यातील अनेक भागात अवकाळी पाऊस, वादळी वारे आणि गारपीट होत आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या उन्हाळी पिकांचे नुकसानही झाले आहे. निवडणुकीच्या काळात शेतकरी विवंचनेत सापडला आहे. त्यामुळे त्याला दिलासा देण्यासाठी लोकसभा निवडणुकीत उमेदवार असलेले सर्व नेते गारपिटग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर बघायला मिळत आहे. आज सकाळपासूनच प्रतापराव जाधव, संजय गायकवाड, शेतकरी नेते रविकांत तुपकर हे मोताळा तालुक्यात शेतकऱ्यांच्या बांधावर दाखल झाले आहेत. यावेळी सर्वच नेते शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेत त्यांना दिलासा देतांना पाहायला मिळत आहे.
धैर्यशील मोहिते पाटील पहाटेपासून शेतकऱ्यांच्या बांधावर
सोलापूरच्या माळशिरस तालुक्यात वादळी वारे व गारपिटीचा फटका बसला आहे. त्यामुळे धैर्यशील मोहिते पाटील पहाटेपासून नुकसानग्रस्त भागाचा दौरा करतांना पाहायला मिळत आहे. काल माळशिरस तालुक्यातील नातेपुते, मांडवे, दहिगाव या परिसरात वादळी वारे आणि गारपिटीने दणका दिला होता. यात अनेक घरांचे पत्रे उडून गेले, झाडे, विजेचे खांब पडले, काही ठिकाणी जनावरे दगावली आहेत. या नुकसानीची माहिती कळताच आपल्या वाढदिवसाच्या कार्यक्रम सोडून धैर्यशील मोहिते पाटील पहाटेपासून या भागातील नुकसानीची पाहणी करीत आहेत.
धनंजय मुंडे भरपावसात पाहणीसाठी बांधावर...
मागील दोन तीन दिवसात सातत्याने बीड जिल्ह्यात बहुतांश भागात अवकाळी पाऊस व काही ठिकाणी गारपीट झाली आहे. यामुळे आंबा, डाळिंब, यांसह मिरची, टोमॅटो, भाजीपाला आदी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान, राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी पडत्या पावसात धारूर तालुक्यातील चोरंबा, सोनीमोहा, आंबेवडगाव आदी गावांना भेटी देऊन अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या आंबा, डाळिंब, मिरची, टोमॅटो आदी पिकांची पाहणी केली, तसेच शेतकऱ्यांना धीर दिला. तसेच, अवकाळीने फळांची व भाज्यांची पडझड झाली असून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून त्याचे अहवाल राज्य शासनाकडे तातडीने पाठवावेत, अशा सूचना यावेळी धनंजय मुंडे यांनी केल्या.
भंडारा जिल्ह्यात सलग पाचव्या दिवशीही पावसाची हजेरी....
हवामान खात्यानं वर्तवलेल्या अंदाजानुसार भंडारा जिल्ह्यात मागील पाच दिवसांपासून पावसाची रिपरिप सुरू आहे. काही भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस, तर कुठं रिपरिप सुरू आहे. आज पाचव्या दिवशीही सकाळपासून पुन्हा एकदा पावसाची सुरुवात झालेली आहे. भंडारा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात उन्हाळी भात पिकाची लागवड केली जाते. हा पाऊस भात पिकासाठी नवसंजीवनी ठरला आहे. यासोबतच बागायती शेतीला या पावसाचा फायदा झाला आहे. प्रखर उष्णतेमुळे प्रचंड उकाळा निर्माण झाला होता. मात्र, आता पाच दिवसापासून सुरू असलेल्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. यामुळं ऐन उन्हाळ्यातच आता नागरिकांना छत्र्या आणि उबदार कपडे वापरावे लागत आहेत. विशेष म्हणजे अनेक उमेदवार आता नुकसानग्रस्त भागात पाहणी करणार असल्याची माहिती मिळत आहे.
इतर महत्वाच्या बातम्या :