Congress Vs BJP : काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी 'मोदी' आडनावावरून केलेल्या वक्तव्यानंतर गुजरातमधील कोर्टाने त्यांना 2 वर्षांची शिक्षा सुनावली आहे. यानंतर राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे. लोकसभा सचिवालयाने यासंबंधीत नोटिफिकेशन देखील जारी केलं आहे. यावरूनच आता देशासह राज्यातील राजकरण चांगलंच तापलं आहे. आज राज्यभरात भारतीय जनता पक्षाच्या वतीने राहुल गांधी यांच्या विरोधात आंदोलन करण्यात येत आहे. तर काँग्रेसच्या वतीने राज्यभरात राहुल गांधी यांच्या समर्थनात आणि भाजपच्या विरोधात आंदोलन करण्यात आलं आहे.    

  


Congress Vs BJP : भिवंडीत राहुल गांधी विरोधात भाजपकडून जोडे मारो आंदोलन


काँग्रेस नेते राहुल गांधी यांना शिक्षा सुनावल्यानंतर काँग्रेसचे आंदोलन सुरू झाले आहे. मात्र ओबीसी समाजाचा अपमान केल्यामुळे देशभरात राहुल गांधी यांच्या विरोधात भाजप रस्त्यावर उतरली असून राज्यात भाजप व शिवसेना शिंदे गट रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहे. भिवंडी शहरातील धामणकर नाका परिसरात महिला कार्यकर्त्यांनी राहुल गांधी यांच्या पोस्टरला जोडे मारून आपला निषेध नोंदवला आहे. तसेच भाजपाने राहुल गांधी यांच्या विरोधात घोषणाबाजी करत आंदोलन केल. या आंदोलनात भाजपाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.


Congress Vs BJP : राहुल गांधी यांच्यावर केलेल्या कारवाईचा निषेध करण्यासाठी बीडमध्ये काँग्रेसचे तीव्र आंदोलन


राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केल्यानंतर बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काँग्रेसच्या वतीने केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात तीव्र घोषणाबाजी करून आंदोलन करण्यात आलं. राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करणे म्हणजे लोकशाहीला धोका निर्माण झाल्यासारखं आहे. त्यामुळे तात्काळ त्यांच्यावर केलेली कारवाई मागे घेण्यात यावी यासाठी काँग्रेसच्या वतीने हे आंदोलन करण्यात आलं.


Congress Vs BJP : भंडाऱ्यात भाजपचं काँग्रेसविरुद्ध आंदोलन


राहुल गांधींच्या विधानाच्या विरोधात भंडाऱ्यात भाजप खासदार सुनील मेंढे यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन करून राहुल गांधी यांचा निषेध नोंदविला.


Congress Vs BJP : धाराशिव येथे महाविकास आघाडीच्या वतीने रास्ता रोको


काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांची खासदारकी षडयंत्र करून रद्द केली. तसेच मोदी सरकार शासकीय संस्थांचा गैरवापर करून विरोधकांची मुस्कटदाबी करत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. यावेळी शासकीय विश्रामगृह शिंगोली येथील सोलापूर औरंगाबाद महामार्ग तब्बल एक तास अडवण्यात आला.


Congress Vs BJP : भाजपने चंद्रपुरात राहुल गांधींविरोधात केली निदर्शने


राहुल गांधी विरोधात आज भाजपने चंद्रपुरात निदर्शने केली. राहुल गांधी यांची कृती ही न्यायालयीन निर्णयाचा अनादर करणारी आणि ओबीसी समाजाचा अपमान करणारी असल्याचा भाजपचा आरोप आहे. चंद्रपूर शहरातील जटपुरा गेट परिसरात झालेल्या आंदोलनात भाजप कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येत सहभाग घेतला. 


Congress Vs BJP : यवतमाळमध्ये भाजपचा निषेध करीत काँग्रेसचे आंदोलन


यवतमाळ मध्ये काँग्रेस कमिटीच्या वतीने संविधान चौकात आंदोलन करण्यात आले. भाजप सरकारचा तीव्र शब्दात निषेध नोंदवला. राहुल गांधी हे देशातील प्रत्येक नागरिकासाठी लढत आहे. भारतीय संविधान वाचवण्यासाठी लढत आहे. त्यामुळे भाजप सरकारने हुकूमशाही पध्दतीने कारवाई केल्याचा आरोप काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी केला.