Sagar bungalow, Mumbai : भाजपने माढा लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना पुन्हा एकदा उमेदवारी दिली आहे. तर अहमदनगरमधून देखील खासदार सुजय विखे-पाटील (Sujay Vikhe Patil) पुन्हा एकदा मैदानात उतरणार आहेत. दरम्यान दोन्ही मतदारसंघातील नाराज झालेल्या नेत्यांची सागर बंगल्यावर गर्दी केलेली पाहायला मिळत आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) नाराज नेत्यांची समजूत काढताना दिसत आहेत. शिवाय, सातारा लोकसभेसाठी (Satara Loksabha) अद्याप उमेदवारी जाहीर करण्यात आलेला नाही. त्यामुळे सातारा, माढा, अहमदनगर आणि रत्नागिरी लोकसभा मतदारसंघातील अनेक नेते सागर बंगल्यावर दाखल झाले आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) सध्या अनेक मतदारसंघातील तिढा सोडवण्यासाठी मॅरथॉन बैठका घेताना दिसत आहेत. 


अहमदनगरमध्ये भाजपचा अंतर्गत वाद चव्हाट्यावर 


मंत्री राधाकृष्ण विखे पाटील सागर बंगल्यावर पोहोचले आहेत. नगरमध्ये भाजपचा अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. त्यामुळेच विखे-पाटील फडणवीस यांची भेट घेण्यासाठी आले आहेत. अहमदनगरमधून  राधाकृष्ण विखे पाटील यांचे सुपूत्र सुजय विखे-पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. दरम्यान, माजी मंत्री राम शिंदे यांनी अहमदनगरसाठी मी इच्छूक असल्याचं विधान देखील केलं होतं. त्यामुळे भाजपमध्ये अंतर्गत वाद वाढीस लागला होता. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार निलेश लंके यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत शरद पवारांच्या पक्षाची तुतारी हाती घेतली. त्यामुळे  नगरमध्ये सुजय विखे पाटील विरूद्ध निलेश लंके सामना पाहायला मिळणार असल्याचे बोलले जात आहे. 


रत्नागिरीबाबतही सागर बंगल्यावर खलबतं


रत्नागिरी आणि सिंधुदुर्गच्या जागेवरुनही महायुतीमध्ये तिढा कायम आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातील प्रमुख पदाधिकारी देखील सागर बंगल्यावर दाखल झाले आहेत.  राजन तेली आणि प्रमोद जठार देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यासाठी वेटींगवर आहेत. केंद्रीय मंत्री नारायण राणे लोकसभा निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. तर दुसरीकडे मंत्री उदय सामंत यांचे बंधू शिंदे गटाकडून लोकसभा लढवण्यावर ठाम आहेत. 


माढा मतदारसंघातून नाराज नेत्यांची संख्या वाढली 


भाजपने माढा लोकसभा मतदारसंघातून रणजितसिंह मोहिते पाटील यांना उमेदवारी दिल्यानंतर नाराज नेत्यांची संख्या वाढली आहे. मोहिते पाटलांचा एक गट तुतारी हाती घेण्याच्या तयारीत आहे. दरम्यान, आता भाजप आमदार राम सातपुते हे देखील देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यास सागर बंगल्यावर दाखल झाले आहेत. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर अनेकांची नाराजी दूर करण्याचे आव्हान असणार आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या 


CM Eknath Shinde:मेहुण्याला ईडीची नोटीस आल्यावर शेपूट घालून दिल्लीत कोणं गेलं होतं? एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला