Pune MNS :  मागील काही दिवसांपासून पुण्यातील मनसेत असलेले वाद सातत्याने चव्हाट्यावर येत आहेत. मनसेचे नेते आणि कार्यकर्ते डॅशिंग नेते वसंत मोरे यांच्या भूमिकेवर नाराज (vasant more) असल्याचं चित्र आहे. त्यामुळे काही प्रमाणात मनसेत दोन गट पडले आहेत. वसंत मोरे यांच्यामुळे पक्षाची बदनामी होत आहे. त्यामुळे वसंत मोरे यांच्याबद्दल भूमिका पक्ष दोन दिवसात घेणार, अशी माहिती मनसे नेते (Pune Mns) बाबू वागस्कर यांनी दिली आहे. 


निलेश माझिरे यांची हकालपट्टी केल्यानंतर त्यांच्यासोबत चारशे जणांनी मनसे पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. त्यामुळे तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. पुण्यात मनसे नेत्यांची तातडीची बैठक बोलावली होती. त्या बैठकीत बाबू वागस्कर यांनी ही माहिती दिली आहे. या बैठकीत वसंत मोरे यांनी दांडी मारल्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. 


वसंत मोरे यांच्याबाबत आज चर्चा झाली नसली तरी सुद्धा, त्यांनी व्यक्त केलेल्या नाराजीवर पक्ष अधिकृतपणे दोन दिवसात भूमिका स्पष्ट करेल, असं वागस्कर यांनी सांगितलं आहे. मनसे शहराध्यक्ष साईनाथ बाबर देखील या बैठकीला उपस्थित होते. मात्र वसंत मोरेंंनी दांडी मारली. कोअर कमिटीने ही बैठक बोलवली होती.


वसंत मोरेंच्या वक्तव्यांमुळे मनसेत नाराजी
पुण्यातील मनसेत दोन गट झाल्याचं चित्र आहे. वसंत मोरे सातत्याने पक्षाची बदनामी होईल, अशी वक्तव्ये करत आहेत. त्यामुळे त्यांच्याबाबतीत दोन दिवसांत विचार केला जाईल, असं या बैठकीत ठरलं आहे. वसंत मोरेंची वागणूक पाहून कोअर कमिटी थेट वसंत मोरेंची तक्रार राज ठाकरेंकडे करणार आहे. अनेकदा वसंत मोरेंनी कोअर कमिटीच्या कामावर टीका केली आहे. त्यामुळे कोअर कमिटी आक्रमक झाल्याचं चित्र आहे. 


माझिरेंनी 400 सदस्यांचे राजीनामे दाखवावे
पुण्यात मनसेला मोठं खिंडार पडलं आहे. मनसेचे पुणे  माथाडी कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष पदावरुन नीलेश माझिरे यांची हकालपट्टी केल्यानंतर त्यांच्यासह 400 पदाधिकारी आणि सदस्यांनी मनसेला राम राम ठोकला आहे. या सगळ्यांच्या राजीनाम्यामुळे पुण्यात मनसे खिळखिळी होण्याची शक्यता आहे. रविवारी एका दिवसात 400 जणांनी राजीनामा दिला. ज्या वेगात ही माहिती अनेक सदस्यांपर्यंत पोहोचेल त्या वेगात राजीनामे दिले जातील, असा विश्वास नीलेश माझिरे यांनी व्यक्त केला होता. मात्र यावर कोअर कमिटीने माझिरेंना आव्हान दिलं आहे. 400 राजीनामे दाखवावे, असं माझिरेंना म्हटलं आहे. त्यामुळे येत्या काळात वसंत मोरे, निलेश माझिरे यांच्याबाबत पक्ष नेमकी काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.