Ambadas Danve On Bhagat Singh Koshyari: छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल बोलतांना औरंगाबादच्या एका कार्यक्रमात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलेल्या एका वादग्रस्त विधानावरून राज्यभरात संतापाची लाट पाहायला मिळत आहे. शिवप्रेमींकडून ठिकठिकाणी आंदोलन केले जात आहे. तर विरोधकांकडून देखील टीका होतांना पाहायला मिळत आहे. दरम्यान यावरूनच विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी राज्यपालांवर निशाणा साधला आहे. राज्यपालांनी महाराष्ट्राची नाक रगडून माफी मागावी,अन्यथा जनता तुम्हाला टकमक टोकावर घेऊन जाईल असा इशारा अंबादास दानवेंनी दिला आहे. औरंगाबाद येथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते.


यावेळी बोलतांना दानवे म्हणाले की, महाराष्ट्राचे राज्यपाल असतील किंवा भाजपचे प्रवक्ते, आमदार असतील यांनी शिवाजी महाराजांच्या विरुद्ध टीका करण्याचा विडा उचलला आहे. अशा प्रकारची टीका अफजलखान करत होता. त्यामुळे शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त विधान करणाऱ्या या सर्वांनी महाराष्ट्राच्या जनतेची नाक रगडून माफी मागावी, खास करून राज्यपालांनी देखील नाक रगडून माफी मागावी. अन्यथा जनता त्यांना टकमक टोकावर घेऊन जाईल अशा प्रकारचे टीकास्त्र विरोधी पक्षनेते आमदार अंबादास दानवे यांनी भाजपच्या नेत्यांवर सोडलय.


शिंदे गटावर टीका...


दरम्यान याचवेळी बोलतांना दानवे यांनी शिंदे गटावर देखील टीका केली आहे. स्वतःच्या विचाराशी गद्दारी करतात त्यांनी देशप्रेम शिकवू नये असा टोला दानवे यांनी यावेळी लगावला आहे.  ज्यांनी स्वताच्या पक्षात गद्दारी केली, त्यांनी देशप्रेमाच्या गप्पा मारु नये, शिवसेनेला देश प्रेम शिकवण्याची गरज नाही. जी लोकं शिवरायांचा अपमान सहन करतात अशा लोकांनी देश प्रेमावर बोलण्याची गरज नाही, असेही दानवे म्हणाले. 


फडणवीसांवर साधला निशाणा...


दरम्यान याचवेळी बोलतांना दानवे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर देखील टीका केली आहे. फडणवीस यांनी विदर्भाला काय दिले?, तुमचा एक गाव किंवा मतदार संघ सुधारला म्हणजे नागपूर, विदर्भ सुधारलं नाही. विदर्भातील रस्त्यांची काय परिस्थिती आहे. काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्यावर दगड फेकू नयेत, असेही दानवे म्हणाले.