President Election: पुढील महिन्यात होणाऱ्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीची रणनीती ठरवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मंगळवारी दिल्लीत विरोधी पक्षांच्या नेत्यांची बैठक बोलावली आहे. या बैठकीला शरद पवार यांनी एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनाही उपस्थित राहण्याचे निमंत्रण दिले होते. मात्र ओवेसी या बैठकीत सहभागी होणार नाहीत. या निमंत्रणाबद्दल ओवेसी यांनी शरद पवार यांचे आभार मानले आहेत. या बैठकीला ओवेसींऐवजी औरंगाबादचे AIMIM खासदार इम्तियाज जलील उपस्थित राहणार आहेत.


शरद पवार यांच्या आधी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसंदर्भात 15 जून रोजी दिल्लीत विरोधी पक्षांच्या नेत्यांची बैठक घेतली. मात्र या बैठकीला AIMIM ला आमंत्रित करण्यात आले नव्हते. या बैठकीला शरद पवारही उपस्थित होते. बैठकीत ममता बॅनर्जींसह अनेक नेत्यांनी शरद पवार यांना राष्ट्रपतीपदाचे उमेदवार होण्यासाठी विनंतीही केली होती, पण त्यांनी नकार दिला. शरद पवारांनी नकार दिल्यानंतर विरोधी पक्षनेत्यांनी जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारुख अब्दुल्ला यांच्यासमोर राष्ट्रपतीपदाचा उमेदवार होण्याचा प्रस्ताव ठेवला होता. मात्र फारुख अब्दुल्ला यांनीही याबाबत अनिच्छा व्यक्त केली आहे.


दरम्यान, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मंगळवारी दिल्लीत होणाऱ्या विरोधी पक्षनेत्यांच्या या बैठकीपासून स्वतःला दूर केले आहे. त्या या बैठकीला येणार नाही. काही तातडीच्या कामामुळे ममता बॅनर्जी या बैठकीला उपस्थित राहू शकणार नसल्याचे पक्षाच्या नेत्यांचे म्हणणे आहे. त्यांच्या जागी टीएमसी खासदार पुतणे आणि टीएमसीचे राष्ट्रीय सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी या बैठकीत सहभागी होणार आहेत. 18 जुलै रोजी राष्ट्रपती पदासाठी मतदान होणार आहे. तसेच 21 जुलै रोजी निकाल जाहीर होणार आहेत. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ 24 जुलै रोजी संपत आहे.


इतर महत्वाच्या बातम्या: 


Presidential Election: शरद पवारांच्या नेतृत्वाखाली 21 जूनला विरोधी पक्षांची बैठक, ममता बॅनर्जी राहणार गैरहजर
President Election 2022 : राजनाथ सिंह यांची उद्धव ठाकरेंसोबत चर्चा, राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत NDA साठी मागितला पाठिंबा