President Election 2022 : पुढील महिन्यात राष्ट्रपतीपदाची निवडणूक 2022 होणार आहे, अशा परिस्थितीत सरकार आणि विरोधी पक्ष या दोघांनीही तयारी सुरू केली आहे. भारतीय जनता पक्षाचे (BJP) ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) यांनी गुरुवारी महाराष्ट्राचे महाविकास आघाडी सरकार (MVA) मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याशी फोनवर चर्चा केली. सुत्रांच्या माहितीनुसार, या संवादात राजनाथ सिंह यांनी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत एनडीएच्या (NDA) उमेदवारासाठी उद्धव ठाकरेंकडे पाठिंबा मागितला आहे. 


राजनाथ सिंह आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीची शक्यता


एनडीएच्या वतीने राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारासाठी विरोधी पक्षांच्या नेत्यांशी बोलण्याची जबाबदारी राजनाथ सिंह आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्यावर देण्यात आली आहे. या फोन कॉलनंतर राजनाथ सिंह आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीची शक्यताही बळावली आहे. लवकरच दोन्ही नेत्यांची दिल्ली किंवा मुंबईत औपचारिक भेट होण्याची शक्यता आहे.


ममता यांच्या नेतृत्वाखाली विरोधकांची बैठक
याआधी बुधवारी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीतील उमेदवारीबाबत विरोधी पक्षांच्या नेत्यांची बैठक झाली, त्यात शरद पवार यांचे नाव सुचवले गेले, मात्र या बैठकीला उपस्थित असलेल्या पवारांनी ही उमेदवारी नाकारली. बैठकीत ममता बॅनर्जी यांनी फारुख अब्दुल्ला आणि गोपाल कृष्ण गांधी यांच्या नावाचाही प्रस्ताव मांडला. या संदर्भात संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी ममता बॅनर्जी, काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे, सपा अध्यक्ष अखिलेश यादव, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि ओरिसाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांच्याशी फोनवर चर्चा केली आहे. विरोधी पक्षांच्या नेत्यांनी राजनाथ सिंह यांच्यासमोर एनडीएच्या उमेदवाराचे नाव देण्याची मागणी केली आहे.


पुढील बैठक 21 जून रोजी
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पुढील बैठक 21 जून रोजी होण्याची शक्यता आहे. बुधवारी झालेल्या बैठकीत एक ठराव मंजूर करण्यात आला, ज्यामध्ये राष्ट्रपतीपदासाठी संविधानाचे रक्षण करू शकेल अशा व्यक्तीची गरज असल्याचे म्हटले होते. मात्र, निमंत्रितांपैकी पाच पक्षांनी बैठकीला हजेरी न लावल्याने बैठकीचा रंग काहीसा फिका पडला. या पक्षांमध्ये आम आदमी पार्टी, तेलंगणा राष्ट्र समिती (TRS), बिजू जनता दल, अकाली दल आणि YSR काँग्रेस यांचा समावेश आहे.


बसपा आणि टीडीपी सामील झाले नाहीत
बुधवारी झालेल्या विरोधी बैठकीत बहुजन समाज पक्ष (BSP) आणि तेलुगु देसम पार्टी (TDP) या पक्षांनाही निमंत्रण न मिळाल्याने ते बैठकीला उपस्थित राहिले नाहीत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बैठकीत ममता बॅनर्जी यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला आणि सांगितले की, तपास यंत्रणांच्या माध्यमातून भाजप विरोधी पक्षमुक्त भारत करण्याच्या अजेंड्यावर काम करत आहे आणि केवळ निवडक विरोधी पक्षांच्या नेत्यांना लक्ष्य केले जात आहे.