Pandharpur Mangalwedha vidhan sabha : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर मंगळवेढा विधानसभा (Pandharpur Mangalwedha vidhan sabha) मतदारसंघात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. विधान परिषदेचे माजी आमदार प्रशांत परिचारक (Prashant Paricharak) हे अपक्ष किंवा तुतारी घेऊन निवडणूक रिंगणात उतरणार हे जवळपास निश्चित झालं आहे. आजपासून प्रशांत परिचारक यांनी गाव भेट दौऱ्याला सुरुवात देखील केली आहे. त्यांच्या या दौऱ्याला कार्यकर्त्यांचा मोठा प्रतिसाद मिळत असल्याचं दिसत आहे. यामुळं भाजप आमदार समाधान अवताडे (Samadhan Awatade) यांचं टेन्शन वाढल्याचं बोललं जात आहे.
आमदार समाधान अवताडे यांनी आयोजित केलेल्या मेळाव्यास परिचारक अनुपस्थित
पंढरपूर व मंगळवेढा या दोन्ही तालुक्यातून कार्यकर्त्यांनी तुतारी किंवा अपक्ष रिंगणात उतरायचा आग्रह धरल्याने परिचारक यांनी गाव भेट दौरा सुरु केला आहे. दोन दिवसापूर्वी देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजप आमदार समाधान अवताडे यांनी आयोजित केलेल्या मेळाव्यास परिचारक अनुपस्थित राहिले होते. या मेळाव्यात विद्यमान आमदार समाधान अवताडे यांनी मोठे शक्ती प्रदर्शन करीत आपली ताकद पक्षाला दाखवून दिली होती. त्यामुळं याच मेळाव्यात फडणवीसांनी आमदार समाधान अवताडे यांना ताकद देण्याचे आवाहन केल्याने परिचारक समर्थक नाराज झाले होते.
तुतारीची उमेदवारी कोणाला मिळणार?
दरम्यान, आता प्रशांत परिचारक यांनी पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात उतरण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. त्यामुळं भाजप आमदार समाधान अवताडे यांच्या अडचणी वाढणार आहेत. सध्या पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातून भाजपकडून समाधान आवताडे तर महाविकास आघाडी कडून भगीरथ भालके किंवा अनिल सावंत या दोघांची नावे चर्चेत आहेत. अशातच आता परिचारकही रिंगणात उतरण्याच्या तयारीत आल्याने तुतारीची उमेदवारी कोणाला मिळणार? याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
पंढरपुरात बहुरंगी लढत होणार
यावेळी विधानसभेच्या निवडणुकीत अवताडे आणि परिचारक हे दोघेही निवडणूक रिंगणात असणार असून परिचारक महाविकास आघाडीतून उभारणार की अपक्ष हेही लवकरच समोर येईल. गेल्यावेळी 2021 साली दिवंगत आमदार भारत भालके यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत आमदार अवताडे यांना विजयी करण्यासाठी भाजप नेत्यांनी परिचारक यांना अवताडेंच्या पाठिशी उभे राहण्याचे सांगितले, ज्यामुळे भाजपने ही जागा जिंकली होती. आता, परिचारक आणि अवताडे हे दोघेही रिंगणात उतरल्यास भाजपच्या अडचणी वाढणार आहेत. गेल्या वेळी थोडक्या मतात पराभूत झालेले भगीरथ भालके यांनीही महाविकास आघाडीकडून उमेदवारी मागितल्याने येथील लढत बहुरंगी होणार हे नक्की. त्यामुळे, पंढरीच्या बहुरंगी लढतीत आमदार समाधान अवताडे हे आपली आमदारकी टिकविण्यासाठी जोरदार तयारीला लागल्याचे दिसून येते.
महत्वाच्या बातम्या: