Prashant Kishor On Lok Sabha Election 2024: नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकांच्या (Lok Sabha Election 2024) रणधुमाळीचा धुरळा संपूर्ण देशभरात पाहायला मिळत आहे. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडताना दिसत आहेत. अशातच राजकीय रणनितीकार प्रशांत किशोर (Prashant Kishor) यांनी यंदाच्या लोकसभा निवडणुकांबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. प्रशांत किशोर यांनी सरकारला मोठ्या प्रमाणावर विरोध होत असल्याचं पाहायला मिळत असल्याचं म्हटलं आहे. एका मुलाखतीत बोलताना प्रशांत किशोर यांनी हे वक्तव्य केलं आहे. 


प्रशांत किशोर म्हणाले की, "मोदी ब्रँडचा पराभव होऊ शकत नाही, असे नाही. त्याला कोणी आव्हान देऊ शकत नाही असं नाही. कोणत्याही राजकीय पक्षानं त्यांना आव्हान दिलं किंवा नाही, लोक त्यांना आव्हान देत आहेत. विरोधी पक्ष कमकुवत असू शकतात, पण सरकारविरोधातील आंदोलन कमकुवत नाही."


प्रशांत किशोर म्हणाले की, हा असा देश आहे, जिथे 60 कोटींहून अधिक लोक दररोज 100 रुपयांपेक्षा जास्त कमवत नाहीत. त्या देशात विरोधक कधीच कमकुवत होऊ शकत नाहीत. असा विचार करणं चुकीचं आहे. विरोधी पक्ष आणि विरोधी पक्षांची निर्मिती कमकुवत होऊ शकते, परंतु देशात होणारी आंदोलनं कधीही कमकुवत होऊ शकत नाहीत. 


100 पैकी फक्त 40 लोक भाजपला मत देतात : प्रशांत किशोर 


सरकारच्या विरोधात युक्तिवाद करताना प्रशांत किशोर यांनी आकडेवारी शेअर केली आणि म्हणाले, कोणालाही 50 टक्के मतं मिळत नाहीत. सोप्या भाषेत, 100 पैकी 40 लोक पंतप्रधानांना मत देतात. ते 40 लोक त्यांच्या कामाचं, हिंदुत्व, राम मंदिर, कलम 370 चं समर्थन करतात. एकूण फक्त 40 लोक आनंदी आहेत, 60 ते 62 लोक आनंदी नाहीत. भाजपसमोर ग्रामीण संकट हा मोठा मुद्दा आहे. यानंतरही भाजप जिंकत असेल तर विरोधी पक्ष तेवढं मजबूत आणि विश्वासार्ह नाही. 


मोदी ब्रँडची ताकद घटतेय : प्रशांत किशोर


प्रशांत किशोर यांनी 2024 च्या लोकसभा निवडणुकीची 2014 च्या निवडणुकीशी तुलना केली. प्रशांत किशोर म्हणाले की, 2014 आणि 2019 च्या तुलनेत मोदी ब्रँडची ताकद कमी होत आहे. 2024 मध्ये मतदारांमध्ये उत्साह होता. 2029 मध्ये सरकारला विकासासाठी आणखी पाच वर्ष मिळावीत, असं लोकांना वाटत होतं. मोदी सरकार आल्यानं देश बदलेल, असा विश्वास एका मोठ्या वर्गाला होता. 2024 मध्ये लोकांना वाटेल की, पर्याय नाही, त्यांना मतदान करावं लागेल. 2014 ते 2019 दरम्यान भाजपची कामगिरी 3 टक्के कमी होती. विशेष बाब म्हणजे, त्यांना राम मंदिर निर्माणाच्या मुद्द्यावर फारशी मतं मिळत नाहीत.