बीड : राज्याचं लक्ष लागलेल्या बीड लोकसभा (Loksabha) मतदारसंघात यंदा महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा थेट सामना होत आहे. मात्र, वंचित बहुजन आघाडीनेही (Vanchit Bahujan Aghadi) बीडमध्ये उमेदवार जाहीर केल्यामुळे चुरस आणखीच वाढली आहे. कारण, बीड सध्या मराठा आरक्षण आंदोलनाचे केंद्रबिंदू बनले असून मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांच्या बैठकांचं ठिकाण आहे. त्यामुळे, जरांगे पाटील यांच्या येथील हालचाली व दौऱ्यांकडेही सर्वांचे लक्ष असते. त्यातच, आपण अॅड. प्रकाश आंबेडकरांना जास्त मानतो, असे जरांगे यांनी यापूर्वीच स्पष्ट केले होते. तर,आज बीड जिल्ह्यातील जाहीर सभेत बोलताना प्रकाश आंबेडकरांनी मनोज जरांगे जर बीडमधून उभारले असते तर निवडून आले असते, असे म्हटलं आहे.
बीड लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीकडून निवडणुकीत उभे असलेले अशोक हिंगे पाटील यांच्या प्रचारार्थ बीडच्या अंबाजोगाई येथे प्रकाश आंबेडकर यांची सभा आयोजित करण्यात आली होती. येथील सभेत बोलताना आंबडेकरांनी मराठा आरक्षण, मोदी सरकार, मनोज जरांगे पाटील आणि वंचित समाजावर भाष्य केलं. अजित पवार यांनी बीडमध्ये मराठा समाजाचा उमेदवार उभा करू असं आश्वासन दिलं होतं. मात्र, आताच्या आघाड्या झाल्या आहेत, त्यांचे शेवटपर्यंत जमणार नाही. कारण, सगळेजण वेगवेगळ्या घोषणा करत आहेत असे प्रकाश आंबेडकर यांन म्हटले.
बीडमध्ये जनतेने जरांगे पाटील यांना निवडून दिलं असतं, घराणेशाहीला पाठिंबा देण्यापेक्षा जरांगे पाटील यांच्यासोबतच वाटाघाटी करू अशी चर्चा मी महाविकास आघाडी सोबत केली होती, असा गौप्यस्फोटही आंबेडकर यांनी केला. तसेच, गेल्या 10 वर्षांमध्ये 74 हजार शेतकरी आणि शेतमजुरांनी आत्महत्या केली आहे, हा आकडा मोदींनी खोटा ठरवून दाखवा हे माझं त्यांना चॅलेंज आहे. नेरेंद्र मोदी यांनी आतापर्यंत आत्महत्या केलेल्या किती शेतकऱ्यांना मदत केली हे सांगावं, असा सवालही त्यांनी जाहीर सभेतून विचारला आहे.
भ्रष्टाचाराच्या याद्या माझ्याजवळ
नरेंद्र मोदी म्हणतात की माझ्या काळात भ्रष्टाचार झाला नाही या भ्रष्टाचाराची काँग्रेसने यादी तयार केली. मात्र, काँग्रेस यावर बोलायला तयार नाही, काँग्रेसने तयार केलेल्या भाजपच्या भ्रष्टाचाराच्या याद्या माझ्याकडे आहेत
नरेंद्र मोदींच्या काळात लोखंड, सिमेंट, ॲल्युमिनियम याचे भाव वाढले तर बेरोजगारी देखील मोठ्या प्रमाणात वाढली आहे. जिओ मुळे अनेक मोबाईल सिम कंपन्या शिल्लक राहिल्या नाहीत. त्यामुळे त्या कंपन्यात काम करणारे तरुण बेरोजगार झाले आहेत. टेलिकॉम कम्युनिकेशनच्या माध्यमातून एकाच व्यक्तीने सर्व संपत्ती कमावली हे सर्व मोदींच्या डोळ्यासमोर होत होतं. सरकारची संपत्ती ही जनतेसाठी असली पाहिजे देशात एकाधिकारशाही रुजवली जात आहे, असेही आंबेडकर यांनी म्हटले.
शरद पवारांनीही आरक्षणाबाबत भूमिका घेतली नाही
हे सरकार व्यापाऱ्यांच आणि लुटारुच आहे.मराठा आरक्षणाच्या आणि ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात एकाही राजकीय नेत्याने भूमिका घेतली नाही. गरीब मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे ती काळाची गरज आहे. शरद पवार देखील आरक्षणाच्या संदर्भात कोणतीच भूमिका घेत नाहीत, असे म्हणत आंबेडकरांनी शरद पवारांनाही लक्ष्य केलं.
हेही वाचा
''जातीसाठी माती खाऊ नका,मला दिल्लीला पाठवून सन्मानित करा''; बीडमधील मेळाव्यात पंकजा आक्रमक