पुणे: काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी आज रायबरेतीलून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर, आज महाराष्ट्रातील पुण्यात येऊन त्यांनी जाहीर सभा घेत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला. तसेच, काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यातून महिला, युवक, शेतकरी आणि सर्वांसाठी दिलेल्या योजनांची माहिती देत मोदी सरकारच्या गॅरंटीवरही टीका केली. तसेच, आपल्या भाषणातून त्यांनी कर्नाटकमधील प्रज्जव रेवण्णा यांच्या प्रकरणाचा उल्लेख करत भाजपवर (BJP) निशाणा साधला. तर, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) पातळी सोडून भाषणबाजी सुरू केल्याचं म्हटलं. मोदींनी शरद पवारांवर केलेल्या टीकेला पुण्यातील सभेतून राहुल गांधींनीही प्रत्युत्तर दिलं आहे.  


राहुल गांधींनी संविधान, शेतकरी, जातनिहाय जनगणना, विकास या विषयांवर राहुल गांधींनी भाष्य केलं. तर, कर्नाटकच्या रेवण्णाचा उल्लेख करत भाजपला कोंडीत पकडलं. रेवण्णाने 400 महिलांवर बलात्कार केलाय, मोदींनी त्याच रेवण्णासाठी मतं मागतिली आहेत. केंद्रीय गृहमंत्रालयास भाजपाच्याच एका नेत्याने पत्र लिहून रेवण्णावर कारवाईची मागणी केली होती. मात्र, गृहमंत्र्यांनी काहीही कारवाई केली. तरीही नरेंद्र मोदी या रेवण्णासाठी कर्नाटकात जाऊन मत मागत आहेत,असे म्हणत राहुल गांधींनी रेवण्णा प्रकरणावरुन भाजपला लक्ष्य केलं.






समुद्राखाली जाण्याची नाटकं


नरेंद्र मोदी कधी पाकिस्तानची गोष्ट सांगतील, कधी समुद्राच्या खाली जाऊन ड्रामा करतील, समुद्रात खाली गेल्यानंतर ते घाबरले होते हे तुम्ही पाहिलं असेल, काही होणार तर नाही ना. राजकारणाची गंमत लावलीय, असे म्हणत राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार प्रहार केला. तसेच, शरद पवारांबद्दल मोदींनी केलेल्या टीकेवरुनही राहुल गांधींनी पलटवार केला. महाराष्ट्रातील वरिष्ठ नेते असलेल्या शरद पवारांबद्दल उलटसुटल बोलत आहेत. पंतप्रधान पदाची गरिमा ठेवली नाही. पंतप्रधानांनी विकासाची, देशाची बात केली पाहिजे, शेतकऱ्यांवर बोललं पाहिजे. पण, शरद पवारांवर बोललं म्हणजे लोकांना आवडेल असं त्यांना वाटतं का, असा सवालही राहुल गांधींनी पुण्यातून विचारला आहे.


महाराष्ट्राच्या रक्तात काँग्रेस


मी जेव्हा महाराष्ट्रात येतो तेव्हा मला आनंद होतो. महाराष्ट्र हे काँग्रेसचं राज्य, जसं मी महाराष्ट्रात लँडींग करतो, मला आनंद वाटतो. मी काँग्रेस संघटनेची बात करत नाही, विचारधारेची बात करत आहे. तुमच्या रक्तात काँग्रेसची विचारधारा आहे, हजारो वर्षांपासून येथे काँग्रेसची विचारधारा आहे. नॅचरल काँग्रेसची विचारधारा महाराष्ट्रात आहे, स्वातंत्र्यांची लढाई, फुलेंची विचारधारा, आंबेडकरांची, गांधींजींची विचारधारा आपल्या सर्वांच्या रक्तात आहे, आपल्या अनेक पिढ्यांमध्ये आहे, असे म्हणत महाराष्ट्रातील जनतेच्या रक्तात काँग्रेस असल्याचं राहुल गांधींनी म्हटलं. 


दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुण्यातील सभेतून शरद पवारांवर हल्लाबोल केला होता. भटकती आत्मा असा उल्लेख करत मोदींनी नाव न घेता शरद पवारांना लक्ष्य केलं होतं. आता, त्याच पुण्यातून राहुल गांधींनी मोदींवर पलटवार केला आहे. वरिष्ठ नेत्यांबद्दल काहीही बोलणं हे पंतप्रधानांना शोभतं का, असा सवाल राहुल गांधींनी विचारला आहे. 


राहुल गांधी सभेतील मुद्दे


* ही संविधान वाचण्यासाठीची लढाई. 
* देशातील पत्रकार आणि एंकर मोदींच्या पे रोलवर असल्यासारखं वागतायत. 
* लोकांना जे अधिकार मिळाले ते संविधानामुळे. संविधान बदलले तर देशातील 20 ते 25 लोकांच्या हातात अधिकार जातील. 
* मोदींनी हे जाहीर करावे की ते आरक्षणाची मर्यादा पन्नास टक्क्यांपेक्षा वाढवतील म्हणून. 
* कॉंग्रेस सत्तेत आल्यावर आरक्षणाची मर्यादा आम्ही संपवून टाकू.  ही मर्यादा कृत्रीम आहे. 
* देशातील दलित, आदिवासी आणि मागासवर्गीय लोकांची एकत्रित संख्या 73 टक्के आहे.  मात्र ते मागासलेले. 
* देशातील मिडीया या 73 टक्क्यांचे प्रश्न मांडत नाही.  मिडीयाचे मालक, मोठे पत्रकार आणि एंकर यामधे यांना स्थान नाही म्हणून त्यांचे प्रश्न मांडले जात नाहीत. 
* याऐवजी मिडीया अंबानीच्या घरातील लग्न दाखवतात. 
* इलेक्ट्रोरल बॉन्डच्या माध्यमातून मोदींनी भ्रष्टाचार केला. 
* मोदींनी 22 उद्योगपतींचे 16 लाख रुपयांचे कर्ज माफ केलय. 
* एवढ्या पैशातून देशातील शेतकर्यांचे कर्ज 24 वर्षांसाठी माफ करता आले असते. 
* मनरेगा 24 वर्षे या पैशातून चालवता आली असती. 
* हाय कोर्टाच्या 650 न्यायाधिशांमधे 100 लोकही 73 टक्के असलेल्या मागासवर्गीयांपैकी नाहीत. 
* बजेटमधील पैसे खर्च करण्यावर मोजक्या लोकांचा अधिकार. 
* कॉंग्रेसचे सरकार आल्यावर आम्ही जातनिहाय जनगणना करणार आणि आर्थिक सर्वेक्षण करणार.  यातून न्यायालय, मिडीया, आणि अधिकारीवर्गात मागासवर्गीय किती आहेत याची आम्ही पडताळणी करु.  त्यानंतर भारताचे राजकारण बदलून जाईल.  हे क्रांतिकारक पाऊल असेल.