Sharmila Pawar on Supriya Sule, Baramati : तुम्ही आजवर पवार नावाच्या व्यक्तींनाच मतदान करत आला आहे. अगोदर पवार साहेबांना मतदान केलं. त्यानंतर मला केलं. आताही पवारांनाच मतदान करा, असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी बारामतीतील लोकांना केले होतं. त्यानंतर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांनीही (Sharad Pawar) याला प्रत्युत्तर दिलं होतं. शरद पवार म्हणाले, अजित पवार काहीही चुकलेलं नाही, पण मूळ पवार आणि बाहेरून आलेले पवार यामध्ये फरक आहे. दरम्यान, शरद पवारांच्या या वक्तव्यानंतर त्यांच्यावर चौफेर टीका झाली. भाजप नेत्यांपासून अजित पवारांपर्यंत सर्वांनी त्यांच्या वक्तव्याचा निषेध व्यक्त केला.
शरद पवारांच्या वक्तव्याचे शर्मिला पवारांकडून समर्थन
शरद पवारांच्या विधानाचे आता पवारांच्या दुसऱ्या सूनेकडून म्हणजेच शर्मिला पवार (Sharmila Pawar) यांच्याकडून समर्थन करण्यात आलं आहे. बारामतीतील भाषणात शर्मिला पवार यांनी अजित पवारांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. " पवारांचा ओरिजनल डीएनए सुप्रिया ताईंमध्येच आहे", असं शर्मिला पवार म्हणाल्या आहेत.
शर्मिला पवार काय काय म्हणाल्या ?
शर्मिला पवार म्हणाल्या, सुप्रियाताईंना पाठिंबा देण्यासाठी येथे मोठ्या संख्येने आलात, याबद्दल मी आमच्या पवार कुटुंबियांच्या वतीने मनापासून आभार व्यक्त करते. येणाऱ्या 7 मे ला आपल्याला तुमच्या ज्या विद्यमान खासदार आहेत, ज्यांनी आजपर्यंत संसद गाजवण्याचे काम केले आहे. तुमच्या आमच्या गोरगरिबांचे शेतकऱ्यांचे प्रश्न मांडायचं काम यशस्वीपणे केलेले आहे. त्या सुप्रिया सुळे यांना पुन्हा एकदा संसद गाजवण्यासाठी आपण सर्वांनी आपले बहुमोल मत द्यावे. तुतारी फुंकणारा माणूस या चिन्हा पुढचं बटन दाबून पुन्हा एकदा ताईंना तुमची सेवा करण्याची संधी द्यावी, एवढीच विनंती आपल्याला करते.
सुप्रियाताई या जन्माने पवार आहेत
एक छोटासा मुद्दा सध्या गाजतोय. आज मी इथे आहे, नंदा वहिनी आहेत. काकी आहेत, शुभांगी आहेत. या आम्ही पवारांच्या सुना आहोत. मूळ पवार कोण हे साहेबांनी सांगितले. त्याच्यावरुन टीका होऊ लागली. परंतु, एक पवारांची सून म्हणून मी निश्चितपणे याच्यावरती एक बोलू शकते. मी किंवा आम्ही सर्व सूना आम्ही पवारांच्या घरांमध्ये त्यांच्या लेकाशी लग्न करून आलेलो आहोत. आम्ही लग्न केलं, या नात्याने आम्ही पवारांच्या सुना आहोत. परंतु सुप्रियाताई या जन्माने पवार आहेत. त्यांच्या रक्ताने त्या या नात्यांमध्ये आहेत. त्याचा मला अजिबात कमीपणा वाटत नाही. मी पवारांची सून आहे याचा मला अभिमान आहे, असंही शर्मिला पवार यांनी स्पष्ट केलं.
इतर महत्वाच्या बातम्या
संजयकाका यावेळी निवडणूक लढा, पुढच्यावेळी महिलेचा नंबर लागू शकतो, अमित शाहांची सांगलीत फटकेबाजी