अकोला : माझं भांडण हे शरद पवारांसोबत आहे, सुप्रिया सुळेंसोबत नाही, त्यामुळेच आम्ही बारामतीमध्ये त्यांना पाठिंबा द्यायचा निर्णय घेतला असल्याचं वंचितते प्रमुख प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी सांगितलं. नाना पटोलेंचा (Nana Patole) प्रस्ताव म्हणजे वरातीमागून घोडे असा प्रकार आहे, त्यामुळे पटोलेंच्या प्रस्तावावर आता कोणताही निर्णय होणार नाही असं आंबेडकरांनी स्पष्ट केलं.
प्रकाश आंबेडकर म्हणाले की, राजकारण हे व्यक्तीगत स्तरावर होत असेल तर ते चुकीचं आहे. राजकारण हे पक्षाच्या स्तरावर होणं आवश्यक आहे. माझं भांडण हे शरद पवारांसोबत आहे, सुप्रिया सुळेंसोबत नाही. शरद पवारांनी आतापर्यंत आपल्या पक्षाचं नुकसान केलं आहे, सुप्रिया सुळे यांनी वंचितचं कोणतंही नुकसान केलं नाही.
राज्यसभेची ऑफर नाही
काँग्रेसच्या नेत्यांनी प्रकाश आंबेडकरांना राज्यसभेची खासदारकी आणि केंद्रात मंत्रिपदाची ऑफर दिल्याच्या बातम्या येत आहेत. त्यावर बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, राज्यसभा खासदारकीचा कोणताही प्रस्ताव माझ्याकडे आलेला नाही, वर्तमापत्रांपर्यंत आलेला प्रस्ताव असेल.
प्रकाश आंबेडकारांच्या वंचितने शनिवारी त्यांचे शिरूरचे उमेदवार मंगलदास बांदल यांची उमेदवारी रद्द केली होती. त्यावर आंबेडकरांनी प्रतिक्रिया दिली. शिरुरच्या उमेदवाराचा बारामतीच्या निर्णयाला विरोध होता, त्यामुळे शिरुरच्या उमेदवाराची उमेदवारी रद्द करण्यात आल्याचं प्रकाश आंबेडकरांनी स्पष्ट केलं.
महाविकास आघाडीमध्ये समन्वय नाही
महाविकास आघाडीतील घटक पक्षांमध्ये समन्वय नाही असा आरोप करत प्रकाश आंबेडकर म्हणाले की, दोन दिवसांपासून काँग्रेस आणि ठाकरे गटाची जी चर्चा सुरू आहे, त्यावरून एकमेकांवर कुरघोडी सुरू असल्याचं दिसतंय. एकमेकांना आम्ही तुला दाखवून देऊ अशी धमक्यांची भाषा सुरू आहे. आम्ही यासंदर्भात काँग्रेसला सांगितलं होतं. मात्र काँग्रेसमध्ये नेताच नसल्यानं यावर कुणीच काही करत नाही.
अमरावतीमध्ये आनंदराज आंबेडकरांना पाठिंबा
अमरावती लोकसभा मतदारसंघामध्ये रिपब्लिनक सेनेचे आनंदराज आंबेडकरांनी पुन्हा एकदा निवडणूक लढवण्याचं जाहीर केलं आहे. या आधी आनंदराज आंबेडकरांनी निवडणुकीतून माघार घेणार असल्याची घोषणा केली होती. तो निर्णय आता बदलण्यात आला आहे. वंचित बहुजन आघाडीने अमरावतीमध्ये आनंदराज आंबेडकरांना पाठिंबा जाहीर केला आहे.
वंचित बहुजन आघाडीकडून आतापर्यंत 25 लोकसभा मतदारसंघांमध्ये उमेदवारी जाहीर केले होते. त्यापैकी चार उमेदवार वंचितकडून बदलण्यात आले आहेत.
ही बातमी वाचा :