मुंबई: शिवसेनेचे एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि राष्ट्रवादीचे अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासाठी यंदाची लोकसभा निवडणूक म्हणजे करो या मरो अशीच आहे, या दोघांचीही प्रतिष्ठा पणाला लागली आहे. अशात या दोघांच्या मदतीसाठी भाजपचे देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis)  मात्र सातत्याने धाव घेत असल्याचं दिसतंय. फडणवीसांनी एकीकडे शिवसेनेकडून न जाहीर झालेली कल्याणची उमेदवारी जाहीर करून श्रीकांत शिंदेंना असणारा भाजप नेत्यांचा विरोध मोडून काढला, तर दुसरीकडे बारामतीमध्ये (Baramati Lok Sabha Election) अजितदादांसाठी अनेक राजकीय समीकरणं जुळवून आणली. त्यामुळे ठाणे आणि बारामतीमध्ये फडणवीसांनी आपलं नेटवर्क सक्रिय केलंच, पण सोबतच महायुतीच्या नाड्या या आपल्याच हाती असल्याचेही संकेत दिलेत. 


कल्याणमधील तिढा सोडवला 


राज्यात भाजप, शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी असे तीन पक्ष एकत्रित निवडणूक लढवत असताना त्यांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागत आहे. त्यात अनेक ठिकाणी शिंदेंच्या उमेदवारांना भाजपच्या कार्यकर्त्यांनी विरोध केला. त्यामुळे शिंदेंना आतापर्यंत त्यांच्या चार खासदारांचे तिकीटही कापावं लागलं.


ठाणे आणि कल्याण या दोन जागेवरून भाजप आणि सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद सुरू होता. श्रीकांत शिंदे यांना जर उमेदवारी दिली तर त्यांचा प्रचार करणार नाही अशी भूमिका भाजपच्या आमदाराने आणि कार्यकर्त्यांनी घेतली होती. पण देवेंद्र फडणवीसांनी केवळ श्रीकांत शिंदे यांची उमेदवारीच जाहीर केली नाही तर भाजपच्या कार्यकर्त्यांनाही कामाला लावल्याचं दिसून आलं.


शिवतारेंनी दादांना दणका दिला, फडणवीसांनी समेट घडवली


बारामती म्हणजे पवार आणि पवार म्हणजे बारामती असं असलेलं समीकरण यंदाच्या निवडणुकीत बदलल्याचं दिसतंय. अजित पवारांनी सवतासुभा मांडल्यानंतर त्यांनी थेट शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांनाच आव्हान देत त्यात ठिकाणी त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं.  


बारामतीमध्ये आतापर्यंत एकहाती सत्ता असलेल्या, आणि कुणीही विरोध करण्याचं धाडस न दाखवणाऱ्या अजितदादांना यंदा मात्र वेगळाच अनुभव आला. शरद पवारांची साथ सोडल्यानंतर आपला दरारा कायम तसाच राहणार अशा अविर्भावात असलेल्या अजितदादांना पहिला दणका दिला तो शिवसेनेच्या विजय शिवतारे यांनी. 


बारामतीमध्ये आतापर्यंत अजितदादांना कुणीही आव्हान देऊ शकलं नव्हतं, विजय शिवतारे यांनी तर थेट दादांनाच आव्हान देत त्यांना खिंडीत पकडलं. विधानसभेच्या निवडणुकीत जाहीररित्या सांगून शिवतारेंना पाडणाऱ्या अजितदादांची भूमिका मात्र मवाळ झाली. शिवतारेंनी दोन वेळा मुख्यमंत्र्यांची भेट घेऊनही आपली भूमिका कायम ठेवली होती. 


त्याचवेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व सूत्रं हाती घेऊन, मुख्यमंत्र्यांच्या मदतीने अजित पवार आणि शिवतारे यांच्यामध्ये समेट घडवून आणली. त्यानंतर शिवतारेंनी माघार घेऊन सुनेत्रा पवार यांना पाठिंबा जाहीर केला. 


हर्षवर्धन पाटलांचा विरोधही मावळला


दुसरीकडे भाजपचे हर्षवर्धन पाटील आणि त्यांच्या कन्या अंकिता पाटील यांनीही अजितदादांसमोर आव्हान उभं केलं होतं. अजित पवारांनी या आधी तीन वेळा आपला विश्वासघात केल्याची जाहीर भूमिका त्यांनी मांडली. त्यामुळे हर्षवर्धन पाटील हे अजित पवारांना मदत करण्याची शक्यता कमी असून ते सुप्रिया सुळेंच्या बाजूने झुकलेत असं बोललं जात होतं. दादांना मात्र त्यातून मार्ग काढता येत नव्हता. 


देवेंद्र फडणवीसांनी मात्र यातून मार्ग काढत हर्षवर्धन पाटलांची समजूत काढली आणि त्यांच्या अडचणी सोडवण्याचं आश्वासन दिलं. या ठिकाणीही हर्षवर्धन पाटलांचे मन वळवून फडणवीसांनी त्यांना अजित पवारांच्या प्रचाराला लावलं.  


प्रवीण माने यांच्या घरी चहापान आणि गणित बदललं


इंदापूरमधील सुप्रिया सुळेंच्या प्रचाराची धुरा सांभाळणारे आणि शरद पवारांचे विश्वासू अशी ओळख असलेले 'सोनाई'चे प्रवीण माने यांनी आपली राजकीय भूमिका बदलली आहे. दोन दिवसांपूर्वीच देवेंद्र फडणवीसांनी थेट प्रवीण मानेंच्या घरी जाऊन चहापान केला आणि त्यानंतर लगेच मानेंनी आपला पाठिंबा सुनेत्रा पवार यांना जाहीर केला. प्रवीण मानेंच्या या बदललेल्या भूमिकेमुळे शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांना मोठा धक्का बसल्याचं सांगितलं जातंय. ही किमयाही देवेंद्र फडणवीसांनीच घडवून आणली हे विशेष.


अजितदादांना जे जमलं नाही ते फडणवीसांनी जुळवून आणलं


बारामतीमध्ये वर्चस्व असूनही ज्या गोष्टी अजित पवारांना जमल्या नाहीत त्या गोष्टी या देवेंद्र फडणवीसांनी सहज जमवून आणल्या हे यातून स्पष्ट होतंय. त्यामुळे बारामतीमध्ये भाजपने, विशेषत: देवेंद्र फडणवीसांनी आपलं नेटवर्क चांगलंच सक्रिय केल्याचं दिसून येतंय. 


फडणवीसांनी समीकरण जुळवलं, पण लढत वस्तादाशी


देवेंद्र फडणवीसांनी सक्रिय होऊन बारामतीमध्ये अजितदादांसाठी अनेक समीकरणं जुळवून आणली खरं, पण समोर शरद पवार आहेत. त्यामुळे अजितदादांना ही निवडणूक दिसतेय तितकी सोपी नाही. कारण फडणवीसांनी कितीही राजकीय गणितं जुळवून आणली तरी लढत ही अजितदादांनाच द्यावी लागणार आहे. त्यामुळे लोकांचा कल नेमका काय असेल यावर बारामतीचं भवितव्य असेल. 


ही बातमी वाचा :