अमरावती : अमरावती लोकसभा मतदारसंघाच्या (Amravati Lok Sabha Constituency) निवडणुकीत पुन्हा एकदा मोठा ट्विस्ट आल्याचं दिसतंय. रिपब्लिन सेनेचे प्रमुख आनंदराज आंबेडकर (Anandraj Ambedkar) यांनी दोनच दिवसांपूर्वी अमरावतीतून निवडणूक लढणार नाही अशी घोषणा केली होती. आता त्यांनी ही घोषणा माघार घेऊन पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात प्रवेश केला. तसेच वंचितने दिलेला पाठिंबाही त्यांनी स्वीकारला आहे. आनंदराज आंबेडकरांच्या या निर्णयामुळे अमरावतीच्या निवडणुकीमध्ये चुरस निर्माण होणार आहे.
कार्यकर्त्यांनी आग्रह केल्यामुळे निवडणूक लढवतोय
आपण माघारीचा निर्णय पुन्हा मागे घेत असल्याचं सांगत आनंदराज आंबेडकर म्हणाले की, मी दोन दिवसांपूर्वी निवडणूक लढणार नाही असं सांगून माघार घेतली होती. पण कार्यकर्त्यांच्या आग्रहामुळे मी निवडणूक लढवत आहे. आंबेडकरी उमेदवार नसल्याने लोकांसमोर मतदान कोणाला करायचं असा प्रश्न होता. म्हणून मी उमेदवारी कायम ठेवत आहे. मी जाहीर करतो की मी ताकदीने ही निवडणूक लढवणार आहे. तसेच वंचितने मला पाठिंबा दिला असून तो मला मान्य आहे.
मी निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतल्यानंतर लोकांनी असंतोष व्यक्त केला, काही जणांनी तर आत्मदहनाचा इशारा दिला. त्याचमुळे लोकांच्या आग्रहास्तव आपण ही निवडणूक लढवण्याचं ठरवलं असल्याचं आनंदराज आंबेडकर म्हणाले. इंदू मिलचं काम माझ्यामुळे सुरू झालं आहे, त्यामुळे माझं काम किती आहे ते मला सांगायची गरज नसल्याचं आनंदराज आंबेडकर म्हणाले.
आदिवासींसाठी पेसा कायद्याची अंमलबजावणी करणार
आनंदराज आंबेडकर म्हणाले की, संविधान आणि लोकशाही तोडण्याच काम सध्या सुरू आहे. तसंच कोणीतरी बोलणारा उमेदवार लोकसभेत जावा म्हणून मी निवडणूक रिंगणात उतरलो आहे. मूळ निवासी आदिवासी बांधवांसोबत जो अन्याय होत आहे, तो मला दूर करायचा आहे. आज अमरावतीमध्ये महिला खासदार असूनही याठिकाणी मेळघाटात महिलेची रस्त्यावर प्रसूती होतेय हे दुर्दैव. मेळघाटात पेसा कायदाची अंमलबजावणीसाठी मी प्रयत्न करणार.
संविधानचं खरे रक्षक आम्ही आंबेडकरवादीच आहोत, आंबेडकर प्रेमी एक झाले म्हणून माझी उमेदवारी कायम ठेवली असंही आनंदराज आंबेडकरांनी सांगितलं.
आनंदराज आंबेडकर हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नातू असून ते रिपब्लिकन सेना या पक्षाचे प्रमुखदेखील आहेत. अमरावतीमधून ते निवडणूक लढवणार असल्याने त्यांच्यासमोर आता भाजपच्या नवनीत राणा आणि प्रहारचे दिनेश बुब हे उमेदवार असतील.
ही बातमी वाचा: