Prakash Ambedkar on Chhagan Bhujbal : मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देऊ नये अशी भूमिका मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी मांडली आहे. यामुळे भुजबळ विरुद्ध मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) असा वाद काही दिवसांपासून रंगला आहे. राज्य सरकारने मराठामधील कुणबी नोंद असणाऱ्यांच्या सगेसोयऱ्यांनाही आरक्षण देण्याचा अध्यादेश काढल्यानंतर भुजबळांनी संताप व्यक्त केला आणि ओबीसींना एकत्र करण्याची मोहीम सुरु केली. तसेच त्यांनी अहमदनगर येथे झालेल्या ओबीसी महाएल्गार मेळाव्यात (OBC Mahaelgar Melava) मंत्रिपदाचा राजीनामा दिल्याचे जाहीर केले.


या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी छगन भुजबळांना सल्ला दिला आहे.  प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे की, ओबीसी नेत्यांनी राजकीय पक्ष काढण्याची घोषणा केली आहे. या घोषणेच्या अगोदर त्यांनी छगन भुजबळ यांचा सल्ला घेतला आहे. ओबीसी पक्ष काढत आहेत ही फार चांगली गोष्ट आहे, असे त्यांनी म्हटले आहे. आता यावर छगन भुजबळ काय बोलणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


भुजबळांनी ओबीसी संघटनेचे नेतृत्व करावे


ते पुढे म्हणाले की, छगन भुजबळ यांना आमचा सल्ला आहे की, आपण या ओबीसी संघटनेचे नेतृत्व करावे. पक्ष म्हणून वंचित बहुजन आघाडी आम्ही सामाजिक राजकीय त्यांना पूर्ण मदत करायला तयार आहोत. वंचित बहुजन आघाडीचा सल्ला छगन भुजबळ मान्य करतील, अशी अपेक्षा आम्ही बाळगतो, असे वक्तव्य प्रकाश आंबेडकर यांनी व्हिडिओच्या माध्यमातून केले आहे.  


प्रकाश शेंडगेंकडून नव्या ओबीसी पक्षाची घोषणा


ओबीसी नेते प्रकाश शेंडगे (Prakash Shendge) यांनी नव्या ओबीसी पक्षाची घोषणा केली आहे. आजवर इतर पक्षातील नेत्यांच्या घरासमोर खेटे मारावे लागत होते. आता ओबीसी-भटक्या विमुक्तांना तिकीट देणारी फॅक्टरी काढली आहे. ज्यांनी आमच्या मतांवर डाका टाकलाय त्यांना घरचा रस्ता दाखवणं गरजेच आहे. म्हणून ओबीसी-भटक्या विमुक्तांचा स्वतंत्र पक्षनिर्माण केला आहे. लोकसभा निवडणूका आमचा पक्ष लढणार आहे. आम्ही 48 जागा लढवणार असल्याचे प्रकाश शेंडगे यांनी म्हटले आहे. 


शेंडगेंचा आंबेडकरांना सल्ला


प्रकाश आंबेडकरांनी (Prakash Ambedkar) आमच्या सोबत यावे. त्यांनी आमच्या सोबत येणं हे कर्तव्य आहे. महाविकास आघाडीत प्रकाश आंबेडकरांची बोळवण एक-दोन जागांवर होण्याची शक्यता आहे. आमच्यासोबत आले तर जास्त जागा मिळतील, असा सल्ला प्रकाश शेंडगेंनी प्रकाश आंबेडकरांना दिला आहे. तसेच दलित समाजाच्या दुसऱ्या फळीलाही आम्ही आमच्यासोबत येण्याचे आवाहन करतोय. ओबीसी, भटके विमुक्त, मुस्लिम हे जर एकत्र आले तर ८० टक्के व्होट बॅक आमच्याकडे असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. 


आणखी वाचा


Chhagan Bhujbal : छगन भुजबळांना धमकीचं पत्र नेमकं कुठून आलं? समोर आली मोठी अपडेट