Prabhakar Sawant On Nilesh Rane Sindhudurg News: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील (Sindhudurg News) कुडाळ नगरपंचायतमध्ये भाजपच्या 'कमळ' चिन्हावर निवडून आलेल्या आठ पैकी सहा नगरसेवकांना जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत (Prabhakar Sawant) यांनी निलंबित केले आहे. तसं जिल्हाधिकारी यांच्या लेखी पत्राद्वारे याकडे लक्ष वेधत आहे. विशेष म्हणजे कुडाळ नगरपंचायतमध्ये भाजपच्या कमळ चिन्हावर आठ नगरसेवक निवडून आले. त्यापैकी सहा नगरसेवकांची शिवसेनेच्या कार्यक्रमात उठबस अधिक तर भाजपच्या कार्यक्रमाकडे पाठ फिरवल्याचे कारण देत निलंबनाची कारवाई पक्षातर्फे करण्यात आली.
सिंधुदुर्गमधील भाजपचे प्रदेशाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी केलेल्या कारवाईनंतर तळकोकणात महायुतीत ठिणगी पडल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. शिवसेना शिंदे गटाचे आमदार निलेश राणे (Nilesh Rane) यांनी भाजप जिल्हाध्य प्रभाकर सावंत कुडाळ नगर पंचायतमधील नगरसेवकांवर केलेली कारवाई मानत नाही. खासदार नारायण राणे यांनी सांगितलं तर मान्य करू, असं सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटलं. यावर भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी निलेश राणेंनी काय म्हणावं हा त्यांचा विषय आहे, आम्ही केलेलं निलंबन हे घटनेच्या चौकटीत असून बरोबर आहे, अशी प्रतिक्रिया दिली आहे.
भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत नेमकं काय म्हणाले?
कुडाळ नगरपंचायतमधील नगरसेवकांचे केलेलं निलंबन भाजपच्या घटनेच्या चौकटीत आहे. वरिष्ठांशी चर्चा करून घेतलेला हा निर्णय आहे, त्यामुळे कोणाच्या मनात किंतु परंतु असण्याचे कारण नाही. निलेश राणे हे आमच्या महायुतीचे नेते आहेत. त्यांना जे काही बोलायचे आहे ते वरिष्ठांशी बोलतील. जिल्हाध्यक्ष म्हणून माझे जे काम होतं ते मी केलं. राणे साहेब आणि रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करतो. राणे साहेबांच्या पक्षात पक्ष हिताच्या दृष्टीने जर कोणाचं काम नसेल, राणेसाहेबांची प्रतिमा कुठे खराब होता कामा नये यासाठी आमचे प्रयत्न आहेत. वैभव नाईक यांनी महायुतीच्या विषयात काही बोलण्याचे कारण नाही. वैभव नाईक यांनी स्वतःच्या पक्षाचं काम नीट करावं, महायुतीतील दोन पक्षात भांडण व्हावे आणि आपलं काहीतरी फावेल असं वैभव नाईक यांना वाटत असेल अशा प्रकारची वैभव नाईक यांची स्टेटमेंट आहे. त्यामुळे त्यांची स्टेटमेंट मी फार गांभीर्याने घेत नाही. राणे कुटुंबामध्ये माझ्यासारखा एक सर्वसामान्य कार्यकर्ता वाद निर्माण करण्याचं कोणतेही कारण नाही. राणे कुटुंबीयांशी माझे सलोख्याचे संबंध आहेत. पक्षशस्तीमध्ये कुठलेही बेशिस्त वर्तन असता कामा नये यासाठी जिल्हा अध्यक्ष म्हणून माझं काम सुरू आहे. कोणाबद्दलही माझ्या मनात आकस नाही. त्यामुळे अशा माझ्या विरोधात केलेल्या पोस्टमुळे काहीही मोठं साध्य होईल असं वाटत नाही. भाजपकडून कटुता वाढविली जात नाही. मागच्या वेळी शिवसेना जिल्हाप्रमुखांची केलेली तक्रार त्यांनी भाजपचे कार्यकर्ते फोडले म्हणून केली होती. मात्र दोन्ही पक्षात सलोखा रहावा यासाठी आमचे प्रयत्न आहेत, असं प्रभाकर सावंत यांनी स्पष्ट केलं.
वैभव नाईकांचा टोला, काय म्हणाले?
सत्ता आहे म्हणून राणे भाजपसोबत आहेत. त्यांना स्वाताच्या स्वार्था पलीकडे कोणतीही विचारधारा नाही. प्रभाकर सावंत यांनी केलेल्या निलंबनाच्या कारवाईला राणे समर्थकांनी केराची टोपली दाखवली आहे. सिंधुदुर्गातील भाजप ही फक्त राणेंमुळे आहे. हे राणे समर्थक आणि त्याच्या नेत्यांनी प्रभाकर सावंत यांच्या नाकावर टिच्चून दाखवून दिलं. आगामी काळात राणेंना वगळून सिंधुदुर्गातील भाजप ही शून्य आहे. हे त्यांनी दाखवून दिल आहे. याची जाणीव भाजपच्या जिल्हाध्यक्षांनी ठेवावी. एवढीच त्यांना विनंती आहे. असा उपरोधिक टोला वैभव नाईक यांनी प्रभाकर सावंत यांच्या नगरसेवक निलंबनाच्या कारवाईवरून लगावला आहे.
नेमकं प्रकरण काय? सहा नगरसेवकांना निलंबित का केलं?
तळकोकणात महायुतीत गेल्या काही दिवसांपासून ठिणगी पडल्याच चित्र पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी पक्ष प्रवेशावरून भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेत ठिणगी पडली होती. आता पुन्हा कुडाळ नगर पंचायतमधील भाजपच्या कमळ चिन्हावर निवडून आलेल्या सहा नगरसेवकांना भाजपमधून निलंबित करण्यात आलं आहे. भाजप पक्षाच्या 'कमळ' निशाणीवर निवडून आलेल्या नगराध्यक्षा प्राजक्ता बांदेकर, गटनेता विलास कुडाळकर, नगरसेवक अभिषेक गावडे, राजीव कुडाळकर, नगरसेविका नयना मांजरेकर, चांदणी कांबळी, संध्या तेरसे, रामचंद्र परब यांचा अधिकृत सिद्धिविनायक नगरविकास आघाडी हा गट स्थापन आहे. मात्र गेल्या काही महिन्यापासून या गटातील नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर, गटनेता विलास कुडाळकर, नगरसेवक अभिषेक गावडे, राजीव कुडाळकर, नगरसेविका नयना मांजरेकर, चांदणी कांबळी हे सहा नगरसेवक पक्षाच्या कोणत्याही कार्यक्रमांमध्ये सहभागी होत नाहीत, त्यांना वेळोवेळी सूचना देऊन सुद्धा ते सहकार्य करत नाहीत. भाजपच्या अधिकृत बैठका, सभा आणि कार्यक्रमांना वारंवार अनुपस्थित राहणे, इतर राजकीय पक्षांच्या व्यासपीठावर हजर राहणे, पक्षाच्या अधिकृत सदस्यता नोंदणी मोहिमेत सहभागी न होणे आणि सक्रिय सदस्यत्व न घेणे, इतर पक्षाच्या सभासद नोंदणी कार्यक्रमांना हजेरी लावणे, पक्षाच्या अधिकृत भूमिकेच्या विरोधात सार्वजनिक विधाने करणे, वरील सर्व बाबी संदर्भात पक्षशिस्त पाळलेली नाही. यामुळे पक्षाच्या प्रतिमेला धक्का बसत असून, पक्षहित बाधित होत आहे. त्यामुळे, भाजपा जिल्हाध्यक्ष या नात्याने, पक्षघटनेतील अधिकारांचा वापर करून पक्षातील सर्व पदांवरून व प्राथमिक सदस्यत्वातून निलंबित केलं असल्याचं प्रभाकर सावंत यांनी पत्रामध्ये म्हटलं आहे.